Mumbai News - Maharashtra Assembly Session-mahadev jankar | Sarkarnama

सरकारचा प्रस्ताव चुकीचा; महादेव जानकरांची कबुली

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 जुलै 2017

सरकारने आणलेला एखादा प्रस्ताव चुकीचा आहे, असे विरोधकांनी म्हटले तर त्यात कुणाला नवल वाटणार नाही. पण एका मंत्र्यांनेच चक्क सरकारचा प्रस्ताव चुकीचा असल्याची कबुली दिली आहे. हे मंत्री आहेत महादेव जानकर. विधानपरिषदेत नियम 260 अंतर्गत सुरू असलेल्या चर्चेवर त्यांनी ही कबुली दिली आहे.

मुंबई : सरकारने आणलेला एखादा प्रस्ताव चुकीचा आहे, असे विरोधकांनी म्हटले तर त्यात कुणाला नवल वाटणार नाही. पण एका मंत्र्यांनेच चक्क सरकारचा प्रस्ताव चुकीचा असल्याची कबुली दिली आहे. हे मंत्री आहेत महादेव जानकर. विधानपरिषदेत नियम 260 अंतर्गत सुरू असलेल्या चर्चेवर त्यांनी ही कबुली दिली आहे.

नियम 260 अन्वये सरकारने मांडलेल्या प्रस्तावात `दुधाच्या विक्रीदरांत 3 रुपयांनी वाढ केली` अशा आशयाचा उल्लेख होता. त्यावर आमदार रामहरी रूपनवर यांनी हरकत घेतली. दुधाच्या विक्रीदरांत की खरेदीदरांत 3 रुपयांची वाढ केली आहे ? असा सवाल रूपनवर यांनी उपस्थित केला. त्यावर पशु संवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर उठून उभे राहिले. विक्रीदरांत नव्हे तर खरेदीदरांत 3 रूपयांची वाढ केली आहे, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले. एवढेच नव्हे तर, हा प्रस्ताव चुकीचा आहे अशी कबुलीही त्यांनी सभागृहात दिली. 

प्रस्ताव चुकीचा असल्याची कबुली मंत्र्यांनी देणे ही एक प्रकारे सरकारची नामुष्कीच आहे. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी जानकर यांचे हे वाक्य कामकाजातून काढून टाकण्याची विनंती केली. पण स्वतः मंत्र्यांनीच कबुली दिली असल्याने तो भाग कामकाजातून काढून टाकता येणार नाही, असे सभापतींनी सांगितले.    

संबंधित लेख