Mumbai news - Jitendra Ahad fake account | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

मुंब्र्यातील तरुणांकडून जितेंद्र आव्हाड यांच्या खोट्या फेसबुक खात्याची निर्मिती

श्रीकांत सावंत
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

व्यक्तिगत फोटोंना पसंती (लाईक्स) मिळत नसल्यामुळे तसेच महिला आणि मुलींशी बोलण्याच्या उद्देशाने मुंब्रा येथील एका इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या तरूणाने चक्क जितेंद्र आव्हाड यांचे खोटे फेसबुक खाते तयार केले. 

ठाणे : व्यक्तिगत फोटोंना पसंती (लाईक्स) मिळत नसल्यामुळे तसेच महिला आणि मुलींशी बोलण्याच्या उद्देशाने मुंब्रा येथील एका इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या तरूणाने चक्क जितेंद्र आव्हाड यांचे खोटे फेसबुक खाते तयार केले. 

गेली काही दिवस त्याच्याकडून या खात्यावरून इतरांशी संवाद साधला जात होता. परंतु आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तत्काळ वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. सप्टेंबर महिन्यांमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी मंगळवारी वर्तकनगर पोलीसांनी तन्वीर अब्दुल माजीद चौगुले (23) या तरूणाला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात दाखल करण्यात आले असून त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याची माहिती वर्तकनगर पोलीसांनी दिली. 

सोशल माध्यमांमध्ये प्रसिद्ध व्यक्ती, अभिनेते आणि राजकीय पक्षातील नेत्यांच्या छायाचित्रांचा वापर करून त्यांची खोटी फेसबुक खाती तयार करण्याचे प्रकार सर्रास वाढू लागले आहेत. परंतु अशा प्रकारे खोटे खाते तयार करणाऱ्या एका इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेणाऱ्या तरूणाला चांगलेच महाग पडले आहे. तन्वीर चौगुले असे या तरूणाचे नाव असून तो मुंब्रा येथील राहणारा आहे. त्याच्या स्वत:च्या वैयक्तिक फेसबुक खात्यावरून पसंती (लाईक्स ) मिळत नसल्यामुळे तो निराश होता. तसेच त्याला महिला आणि मुलींशी संवाद साधण्यास आवडत असले तरी त्याला त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्याने थेट कळवा-मुंब्र्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेचा वापर करून खोटे फेसबुक खाते सुरू केले. 

गेली काही महिन्यांपासून त्याच्याकडून या खात्याचा वापर सुरू होता. परंतु आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलीसांनी या प्रकरणी मंगळवारी तन्वीर यास अटक केली. 

तन्वीर मुंबईतील रिझवी महाविद्यालयात  शिक्षण घेत आहे. त्याने या खात्यावरून अद्याप कोणत्याही प्रकारची फसवणूक केली नसल्याचे पोलीसांच्या समोर आले आहेत. परंतु तरीही पोलीसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरिक्षक आर. आर. सावंत यांनी दिली. 

संबंधित लेख