mumbai news - Encounter specialist Pradip Sharma returned | Sarkarnama

"चकमक फेम' प्रदीप शर्मा परतले; भाजपशी जवळीक निव्वळ योगायोग? 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

चमकफेम पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा नऊ वर्षांनंतर पुन्हा 16 ऑगस्ट 2017 ला महाराष्ट्र पोलिस दलात रूजू झाले. महासंचालक कार्यालयात ते हजर झाले आहेत. शर्मा यांनी बुधवारी महासंचालक कार्यालयातील नियंत्रण कक्षात हजेरी लावली. त्यांना अद्याप कोणतीही नियुक्ती देण्यात आलेली नाही. दरम्यान, शर्मा यांनी सेवेत रूजू झाल्यानंतर अनेक जुन्या अधिका-यांची बुधवारी सायंकाळी भेट घेतली. त्यांच्या सेवेची अद्याप तीन वर्षे बाकी आहेत. या काळात ते काय करतात याकडे सगळ्यांचेच लक्ष राहील.  

मुंबईः चकमक फेम प्रदीप शर्मा भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर या चर्चांना तीन वर्षांपूर्वी उधाण आले होते. त्यातच 2014 मध्ये पश्‍चिम उपनगरातील भाजपच्या अभियान या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे या चर्चेला आणखी बळकटी मिळाली होती, त्यावेळी अंधेरी पूर्व येथून ते निवडणूक लढवण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यातून झालेल्या मोठ्या पोस्टरबाजीमुळे, प्रसिद्धी माध्यमांचेही लक्ष वेधले होते. या सर्व पार्श्वभूमिनंतर शर्मा पुन्हा पोलिस दलात रुजू झाले आहेत, हा निव्वळ योगायोग मानायला राजकीय पंडित तयार नाहीत. 

नव्वदच्या दशकात मुंबईत गॅंगवॉर उफाळून आले होते, त्यावेळी अंडरवर्ल्ड के लोहे को लोहे से काटने के लिए, 1983 च्या बॅचच्या अनेक अधिका-यांना महत्त्वाच्या जबाबदा-या देण्यात आल्या. विजय साळसकर, प्रफुल्ल भोसले, प्रदीप शर्मा एकापेक्षा एक सरस अधिका-यांमुळे गुन्हे शाखेला सोन्याचे दिवस आले. मुंबईत दिवसाला अंडरवर्ल्डच्या शूट आऊटमध्ये एकाच तरी मृत्यू व्हायचा, अशा काळात या 1983 च्या बॅचने अंडरवर्ल्डमध्ये पोलिसांची दहशत प्रस्थापित केली. 

शर्मा यांनी उपनिरीक्षक म्हणून माहिम पोलिस ठाण्यापासून कारकिर्दीला सुरूवात केली. त्यानंतर विशेष शाखा, त्यानंतर घाटकोपर व जुहू या पोलिस ठाण्यातील कारकिर्दीनंतर शर्मा खरे नावारुपाला आले. 1993 मध्ये तत्कालीन अतिरिक्त पोलिस आयुक्त हसन गफूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शंकर कांबळे यांनी विशेष पथक स्थापन केले होते. त्यावेळी उपनिरीक्षक साळसकर व शर्मा हेही या पथकात होते. शर्मा यांनी त्यावेळी एके 47 चा वितरक सुभाष मकडावालाचा एन्काऊंटर केला. तो शर्मा यांचा पहिला एन्कांउंटर होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. घाटकोपर येथे तैनात असताना शर्मा यांनी त्यांची ड्रग माफियांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई केली. पण त्यांनी छोटा राजन टोळीच्या विनोद मटकरला चकमकीत मारल्यानंतर शर्मा ख-या अर्थाने प्रसिद्धीत आले. 2004 मध्ये शर्मा यांनी गुन्हे शाखेच्या कांदीवली कक्षात नियुक्ती करण्यात आली होती. तेथेच त्यांच्यावरील आरोपांच्या मालिकेला सुरूवात झाली. 

एनकाऊंटरमध्ये सहभागी असलेले पोलिस अधिकारी वेगवेगळ्या गॅंगकडून सुपारी घेऊन प्रतिस्पर्धी टोळीच्या गुंडांचा एन्काऊंटर करतात, असे आरोप चकमक फेम अधिका-यांवर झाले. शर्मा यांच्यावरही हे आरोप झाले. अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचाही त्यांच्यावर आरोप झाला. अब्दुल करीम तेलगीप्रकरणानंतर पोलिस दलाचा पडता काळ सुरू झाला. अनेक अधिका-यांवर झाले, काहींना अटकही झाली. 312 चकमक कारवायात सहभागी तसेच चकमकीच 113 गुंडांचा खात्मा करणारे शर्माही याला अपवाद ठरले नाही. काही प्रसिद्धी माध्यमांनी तेलगी प्रकरणातही शर्मा यांच्यावर सुई असे आरोप केले. या आरोपांत तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अमरावती येथे तैनात असताना राम नारायण गुप्ता उर्फ लखन भैय्या याच्या बनावट एन्काऊंटर आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या आरोपातून शर्मा यांना सन 2008 मध्ये पोलिस दलातून निलंबित करण्यात आले होते. बनावट लख्खन भैयाच्या एनकाऊंटर प्रकरणी शर्मा यांच्यासह 13 जणांना अटक करण्यात आली. पुढे 31 ऑगस्ट 2008 ला गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली शर्मा यांना बडतर्फ करण्यात आले. 

पोलिस महासंचालकांच्या या निर्णयाविरोधात अखेर शर्मा यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी राधाकृष्णन व ए.पी. सिन्ही यांच्या खंडपीठाने शर्मा यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नसल्याचे सांगून त्यांची बडतर्फी 7 मे 2009 मध्ये रद्द ठरवली व शर्मा यांना पुन्हा खात्यात घेण्याचे आदेश दिले. मात्र 2013 मध्ये लखनभैय्या बनावट चकमकीप्रकरणी मुंबई न्यायालयाने शर्मा यांची आरोपातून मुक्तता केली. त्यावेळी ख-या अर्थाने शर्मा यांच्या पोलिस दलातील परतीचा मार्ग मोकळा झाला. चकमकीचे शतक पूर्ण करणारे चमकफेम पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा नऊ वर्षांनंतर पुन्हा 16 ऑगस्ट 2017 ला महाराष्ट्र पोलिस दलात रूजू झाले. महासंचालक कार्यालयात ते हजर झाले आहेत. शर्मा यांनी बुधवारी महासंचालक कार्यालयातील नियंत्रण कक्षात हजेरी लावली. त्यांना अद्याप कोणतीही नियुक्ती देण्यात आलेली नाही. दरम्यान, शर्मा यांनी सेवेत रूजू झाल्यानंतर अनेक जुन्या अधिका-यांची बुधवारी सायंकाळी भेट घेतली. त्यांच्या सेवेची अद्याप तीन वर्षे बाकी आहेत. या काळात ते काय करतात याकडे सगळ्यांचेच लक्ष राहील.  
 

संबंधित लेख