Mumbai news BJP spokes person Madhu chavan Critisizes Sanjay Raut | Sarkarnama

वडाची  साल पिंपळाला चिटकवू नका  - भाजपचा संजय राउताना सल्ला

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 19 जून 2017

काश्मीर आणि दार्जिलिंग हे प्रश्न राष्ट्रीय महत्त्वाचे आहेतच पण मुंबईतल्या सर्वसामान्यांना  नाले आणि रस्त्याचे प्रश्नही जिव्हाळ्याचे वाटतात याकडे राऊत यांनी  सोईस्कर दुर्लक्ष करू नये -  मधू चव्हाण 

मुंबई  : शिवसेना- भाजपातील ताणलेल्या संबंधाचे प्रतिबिंब सेनेच्या सामना या मुखपत्रातून उमटत असते. मात्र भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही सामनातून खोचक टीका झाल्याने भाजपच्या जिव्हारी लागली आहे. प्रत्येक वेळी वडाची साल पिंपळाला चिटकवण्याचा प्रयत्न करू नका. असा मैत्रीचा सल्ला भाजपने सेनेला दिला आहे.

 सामनातून भाजपवर टीकेचे लक्ष करताना म्हटले आहे की,  मध्यावधी निवडणुकीत काय होणार यापेक्षा काश्मीर मध्ये काय होणार ? हिंसेच्या वणव्यात जळत असलेल्या दार्जिलिंगचे काय होणार याची शिवसेनेला चिंता  वाटते. त्यामुळे महाराष्ट्रमधील सत्ता टिकेल ? कश्मीर टिकेल का असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून भाजपला विचारला आहे .  

  सामनाचे संपादक उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्ष प्रमुख असले तरी ही अग्रलेखाची भाषा कार्यकारी संपादक संजय राऊत यांची असल्याचे भाजप प्रदेश प्रवक्ते  मधु चव्हाण यांचे म्हणणे  आहे. त्यामुळेच  संजय राऊत यांनी प्रत्येक गोष्टीत ओढून ताणून बोलण्याचा प्रयत्न करू नये असा मैत्रीचा सल्ला मधु चव्हाण यांनी दिला. 

काश्मीर आणि दार्जिलिंग संबधी अमित शहा यांनी समर्पक उत्तरे दिली आहेत. जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानामुळेच आज भारतात काश्मीर आहे. काश्मीर साठी जनसंघ आणि भाजपने विविध आंदोलने केली आहेत. याकडे मधु चव्हाण यांनी लक्ष वेधले. 

 सामनाची भूमिका ही शिवसेनेचीच  असते :  संजय राऊत 

मुंबई  :  सामनाची भूमिका ही शिवसेनेची असते संजय राऊतांची व्यक्तिगत भूमिका नसते. मात्र त्यांना जळी ,स्थळी , काष्ठीआणि  पाषाणी संजय राऊतच दिसतात त्याला माझा नाइलाज आहे, असा पलटवार शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. 'सरकारनामा'शी ते बोलत होते. 

अमित शाह यांच्यावर कोणतीही टीका केली नसताना भाजप स्वतःच्या अंगावर का ओढवून घेत आहे, हे मला समजत नाही. मधू चव्हाण यांनी माझ्यावर टीका करताना सामनाचा अग्रलेख पुन्हा एकदा वाचवा. तसेच नाले व रस्ते यांची चिंता, काळजी फक्त शिवसेनेलाच असून भाजपने त्याची काळजी करू नये, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

संबंधित लेख