Mumbai News : 6 MNS corporators with Shivsena | Sarkarnama

मुंबईत मनसेचे सहा नगरसेवक `शिवबंधनात़`; 18 कोटींचा सौदा : सोमय्या 

ब्रह्मा चट्टे/ समीर सुर्वे
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

शिवसेनेने मुंबईतील महापौरपद कायम ठेवण्यासाठी आज मनसेलाच लोळविले. मनसेचे सातपैकी तब्बल सहा नगरसेवक फोडत शिवसेनेने मास्टरस्टॅोक मारला. महापौरपद मिळविण्यासाठी भाजपलाही यात चितपट करण्यात शिवसेनेला यश आले. मात्र हा घोडेबाजार असल्याचा दावा सोमय्या यांनी केला.  

मुंबई : मुंबई महापालिकेच्या भांडूप प्रभागातील निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून आल्यानंतर पालिकेत फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक पक्षातून फुटले आहेत. हे नगरसेवक स्वतंत्र गट स्थापन करणार आहेत. शिवसेनेने तीन कोटी रूपये देऊन हे नगरसेवक खरेदी केल्याचे आरोप भाजप खासदार किरिट सोम्मया यांनी केल्याने संपूर्ण प्रकरणातील नाट्य वाढले आहे. 

भांडुप पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पराभवनंतर भाजपने मुंबई महापालिकेत आपला महापौर बसवण्याचा इशारा दिला होता. शिवसेनेने खबरदारी म्हणून मनसेच्या सहा नगरसेवकांवर जाळे टाकले. या नगरसेवकांची कोकण आयुक्त कार्यालयात वेगळ्या गटाची नोंदणी करणार आहेत. त्यामुळे आता शिवसेनेचे महापालिकेतील संख्याबळही वाढणार आहे. मात्र, या गटाची नोंदणी करू नये अशी मागणीच मनसेने पत्राद्वारे राज्य निवडणुक आयोगाकडे केली आहे. यामुळे आता गोंधळात भर पडणार आहे. 

नगरसेवकांना विकत घेत असल्याचा आरोप सोमय्यांनी करत त्यांनी निवडणूक आयोग, पोलीस, कोकण महसूल विभाग यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात सोमय्या यांनी, " आमच्या मित्रपक्षाने 4 नगरसेवकांना किडनॅप केले असून, त्यांना 2 ते 4 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे, असा दावा केला आहे. 

मुंबईतील प्रभाग क्र. 116 मध्ये (भांडुप पश्‍चिम) पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा पराभव केला. त्यामुळे मुंबई महापालिकेतील भाजपचे संख्याबळ 83 तर शिवसेनेची संख्या 84 झाली आहे. मात्र शिवसेनेला 4 अपक्ष तर भाजपला 2 अपक्षांची साथ आहे. यात आता मनसेच्या सात नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यास शिवसेनेचे बलाबल 95 होणार आहे. त्यामुळे मुंबईचा महापौर शिवसेनेचाच रहाण्यास मदत होणार आहे. 

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबत संबंधित नगरसेवकांना इशारा दिला. पक्षाने ज्यांना मोठे केले, त्या पक्षातच खंजीर खुपसण्याचा हा प्रकार आहे. मनसेतून बाहेर जाणारे बेईमान आहेत. किती दिवस पळून जाणार? नांदेडमध्ये काय स्थिती झाली, हे आपण सर्व जण पाहत आहेतच. जे जात आहेत, त्यांना निश्चितच पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नसल्याचा दावा त्यांनी केला.

मुंबई महापालिकेतील 
पक्षीय बलाबल (एकूण 227) 

शिवसेना अपक्षांसह - 88 ( 84 + अपक्ष 4 ) 
भाजप, अभासे आणि एका अपक्षासह- 85 (83+ अपक्ष 2 ) 
कॉंग्रेस- 30 
राष्ट्रवादी कॉंग्रेस - 9 

सपा - 6 
एमआयएम - 2 

 

संबंधित लेख