Mumbai Municipal corporation has fix deposits worth 74 thousand crores | Sarkarnama

मुंबई  पालिकेच्या मुदतठेवी 74 हजार कोटींवर

सरकारनामा
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

यापोटी पालिकेला वार्षिक तब्बल चार हजार 500 कोटींचे व्याज मिळत आहे.

मुंबई :  देशातील श्रीमंत महापालिकेचे बिरुद मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेची विविध बॅंकांत जुलैअखेरपर्यंत मुदतठेवींपोटी तब्बल 74 हजार 193 कोटी सहा लाख रुपयांची रक्कम जमा आहे. यापोटी पालिकेला वार्षिक तब्बल चार हजार 500 कोटींचे व्याज मिळत आहे.

जकात बंद केल्याने पालिकेला भविष्यात मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्‍यता आहे. सध्या जकात कराऐवजी लागू करण्यात आलेल्या जीएसटीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकार पालिकेला 699 कोटी 13 लाख रुपये देत आहे.

गेल्या काही वर्षांत पालिकेच्या मुदतठेवींत कोट्यवधीची वाढ होत आहे. पालिकेकडून ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंध बॅंक, विजया बॅंक, आंध्रा बॅंक, कॉर्पोरेशन बॅंक, कॅनरा बॅंक आदी बॅंकांमध्ये 10 ते 731 दिवसांकरिता किमान एक लाखापासून 114 कोटींपर्यंतच्या मुदतठेवी ठेवल्या आहेत.

जून 2018 च्या प्रारंभी विविध बॅंकांमध्ये पालिकेच्या 73 हजार 460 कोटी सहा लाख रुपयांच्या मुदतठेवी होत्या. जूनअखेरीस ही रक्कम 73 हजार 961 कोटी सहा लाखांवर गेली. जुलै प्रारंभी विविध बॅंकांमध्ये 73 हजार 460 कोटी 82 लाख रुपये मुदतठेवींपोटी ठेवण्यात आले होते. 31 जुलैपर्यंत ही रक्कम 74 हजार 193 कोटी सहा लाखांवर गेली. यामुळे गेल्या महिन्याच्या तुलनेत ठेवींत 232 कोटींची वाढ झाल्याचे दिसून येते. 

मुंबई महापालिकेच्या मुदतठेवींच्या रकमेतील जास्तीत जास्त रक्कम ही कोस्टल रोड, मलनि:सारण प्रकल्प, पाणी प्रकल्प आदी मोठ्या कामांसाठी राखून ठेवण्यात आली आहे. आणखी काही कोटींची रक्कम विकासकामे करणाऱ्यांनी अनामत म्हणून भरलेली आहे.
 

संबंधित लेख