Mumbai Graduate Constituencey BJP Shivsena | Sarkarnama

मुंबई पदवीधर मतदारसंघात भाजपला रस : शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा भाजपचा विचार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. नाना पटोले यांच्या राजीनाम्याने रिक्‍त झालेल्या भंडारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा मनोदय शिवसेनेने जाहीर केल्यानंतर भाजपने मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा विचार सुरू केला आहे.

मुंबई : शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा भाजपचा विचार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. नाना पटोले यांच्या राजीनाम्याने रिक्‍त झालेल्या भंडारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा मनोदय शिवसेनेने जाहीर केल्यानंतर भाजपने मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा विचार सुरू केला आहे.

पदवीधर मतदारसंघातून 'मातोश्री'चे निकटवर्तीय मानले जाणारे डॉ. दीपक सावंत निवडणूक लढवतात. ते सध्या आरोग्यमंत्री आहेत. त्यांच्या क्षेत्रात भाजप प्रवेश करणार काय, असा प्रश्‍न विचारला जातो आहे. आमदार आणि नगरसेवकांची संख्या लक्षात घेता भाजपने नोंदणीस प्रारंभ केला आहे. भाजपच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या पर्यायाचा विचार करायचा काय, याबाबत गंभीर चर्चा झाल्याचे समजते.

राजस्थानातील दोन लोकसभा मतदारसंघांत झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने आता महाराष्ट्रातील पटोले यांच्या राजीनाम्यामुळे होणारी भंडाऱ्यातील आणि चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्‍त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आहे. दोन्ही निवडणुका जिंकणे भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यातच शिवसेनेचे भंडारा जिल्ह्यातील पदाधिकारी शिवसेना निवडणूक लढवणारच, असे सांगत आहेत. पक्षश्रेष्ठांशी यासंदर्भात बोलणे झाल्याचेही सांगितले जाते आहे.

आढावा घेण्याचे आदेश
भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंध कधीही ताणले जातात, हे लक्षात घेत आता मुंबई पदवीधरची तयारी करायची काय, अशी विचारणा करण्यात आली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश दिल्याचे समजते.

संबंधित लेख