mumbai congress | Sarkarnama

मुंबईत हताश कॉंग्रेसला नवसंजीवनीची प्रतीक्षा !

संदीप खांडगे पाटील
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

मुंबई : लोकसभा, विधानसभा निवडणुकांपाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समिती यासह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला सातत्याने पराभव पहायला लागला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप स्वतंत्र लढूनही कॉंग्रेसची पराभवाने पाठ सोडली नाही.

मुंबई : लोकसभा, विधानसभा निवडणुकांपाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समिती यासह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला सातत्याने पराभव पहायला लागला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप स्वतंत्र लढूनही कॉंग्रेसची पराभवाने पाठ सोडली नाही. मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांचा पालिका निवडणुकीनंतर राजीनामा, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी नुकताच केलेला कॉंग्रेस पक्षातील पदांचा त्याग या पार्श्‍वभूमी मुंबई प्रदेश कॉंग्रेस कार्यालयातही निरुत्साही वातावरण असून हा निरुत्साह व मरगळ झटकण्यासाठी कॉंग्रेसला नव्या नेतृत्वाकडून नवसंजीवनी मिळण्याची आशा कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. 

रविवारी रात्री 11 वाजता मंत्रालयासमोरील प्रदेश कॉंग्रेस कार्यालयाचा मेट्रो प्राधिकरणाकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने कॉंग्रेसला प्रदेश कार्यालय बंद करावे लागले असून नवीन कार्यालयास अद्यापि तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे. या कालावधीत मुंबई महापालिकेजवळील गांधी भवन व दादर येथील टिळक भवनातून कॉंग्रेसचा कारभार चालविण्यात येईल असे प्रदेश कॉंग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात येत होते. तथापि मुंबई प्रदेश कॉंग्रेसला मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघ, 227 महापालिका मतदारसंघ, लोकप्रतिनिधी, पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा आवाका पाहता हे कार्यालय प्रदेश कॉंग्रेसला वापरण्यास देणे शक्‍य नसल्याने प्रदेश कॉंग्रेसचा कारभार आता दादर येथील टिळक भवनातूनच आगामी तीन ते चार महिने नवीन कार्यालय मिळेपर्यत चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मुंबई प्रदेश कॉंग्रेस कार्यालयापासून ते कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मरगळ व निरुत्साहाचे वातावरण पहावयास मिळते. पालिका निवडणुकीतील यशाबाबत कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आशावादी होते. त्यातच भाजप व शिवसेना युती तुटल्याने कॉंग्रेसला किमान 80 ते 90 जागांची अपेक्षा होती. पण मतदारांनी कॉंग्रेसला झिडकारण्याची परंपरा कायम राहिल्याने कॉंग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुकीतही दारुण पराभव झाला. कॉंग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनाही भाजपच्या राजकारणातील नवख्या परंतु अर्थकारणातील धनदांडग्या उमेदवाराकडून पराभूत व्हावे लागले. 
मुंबई महापालिका निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून संजय निरुपम यांनी मुंबई प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तो राजीनामा स्वीकारला अथवा नाकारला याबाबत दिल्लीतील हायकमांडकडून काहीच निश्‍चित करण्यात आलेले नाही.

महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर संजय निरुपम यांच्या राजकारणाची धारही काही प्रमाणात बोथट झाली असल्याची कॉंग्रेसच्या वर्तुळात चर्चा आहे. त्यातच चार दिवसापूर्वी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी कॉंग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याने नैराश्‍य आलेल्या कॉंग्रेसी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना हा एक झटका बसला आहे. उद्या पक्षाने राजीनामा नाकारला तरीही गुरुदास कामत निष्क्रिय राहिले अथवा पक्षाने राजीनामा स्वीकारला तर पुढे काय करायचे याविषयी मुंबई कॉंग्रेसमधील गुरुदास कामतांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे.

गुरूदास कामत हे स्व. राजीव गांधींचे निकटवर्तीय मित्र असल्याचे व कॉंग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांच्याशी कामतांची जवळीक असल्याने गुरुदास कामत कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेस सोडणार नसल्याची खात्री कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सध्या मुंबई कॉंग्रेसची वाटचाल दिशाहीन अवस्थेत सुरू असून मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाविषयी भिजत घोंगडे कायम आहे. 

संबंधित लेख