mumbai-chitra-wagh-ujwal-gas | Sarkarnama

उज्वल गॅस योजना चांगली; अंमलबजावणी चुकीची : चित्रा वाघ

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्वल गॅस योजनेचा मोठा गाजावाजा करत सुरुवात केली. ही योजना चांगली असली तरीही त्याची अंमलबजावणी अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत आहे. गोरगरिबांच्या तोंडचा घास हिरावणाऱ्या सरकारचे हेच का ते 'अच्छे दिन' असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी पंतप्रधान मोदी सरकारवर आज जोरदार टीका केली. 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्वल गॅस योजनेचा मोठा गाजावाजा करत सुरुवात केली. ही योजना चांगली असली तरीही त्याची अंमलबजावणी अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत आहे. गोरगरिबांच्या तोंडचा घास हिरावणाऱ्या सरकारचे हेच का ते 'अच्छे दिन' असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी पंतप्रधान मोदी सरकारवर आज जोरदार टीका केली. 

मोदींनी गरिबांच्या कल्याणासाठी 'उज्वल गॅस योजना' सुरू केली. परंतु या योजनेमुळे गरिबांचे हक्काचे रॉकेलही बंद झाले. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना फसविण्यात येत असून मोठा घोटाळा होत आहे, असेही चित्रा वाघ म्हणाल्या. ही योजना चांगली असली तरीही तिची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे वाघ यांनी स्पष्ट केले. 

या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना सुरुवातीला पैसे घेऊनच ' गॅस कनेक्शन' दिले जाते. दुर्गम भागात गॅस कनेक्शन घेणाऱ्यांना तो पोहचण्यासाठीच दीडशे ते दोनशे रुपये द्यावे लागतात. साडेआठशे ते नऊशे रुपयाला पडणारा सिलेंडर दीड ते दोन महिने साधारणतः पुरतो. परंतु या गोरगरिबांना इतके पैसे देणे अशक्य असल्याने गॅस कनेक्शन असूनही ते त्याचा वापर करीत नाही, असे काही लाभार्थ्यांनी सांगितल्याचे वाघ म्हणाल्या. हे कनेक्शन घेणाऱ्या लाभार्थ्यांचे रॉकेल बंद केल्यामुळे सरपण आणि प्लॅस्टिक जाळत आहेत. त्यामुळे या गोरगरिबांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे, असेही वाघ यांनी सांगितले. 

शहरी भागात राहणाऱ्या सामान्य जनतेलाच सिलेंडरची किंमत परवडणारी नसल्याने ते या गोरगरिबांना कशी परवडेल? त्यामुळे या सिलेंडरची किंमत कमी करण्याची मागणीही यावेळी वाघ यांनी केली.

संबंधित लेख