mumbai bjp presidentship | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांचे "लाड' मुंबई भाजपत शेलारांची जागा घेणार ? 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 23 जून 2017

मुंबई महापालिकेत भाजपला चांगले यश मिळाल्यानंतर आशिष शेलार यांचे राजकीय वजन वाढले आहे. त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळायला हवी, असे बोलले जाते. परंतु शेलार यांच्याकडे अद्याप पक्षसंघटनेची जबाबदारी आहे. तसेच आपच्या प्रीती मेनन यांनी शेलार यांच्यावर केलेल्या आरोपानंतर पक्षातील नेत्यांनी त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहायला हवे होते मात्र शेलार यांना स्वतः खुलासा करावा लागला, हेही नोंद घेण्यासारखे आहे. 

मुंबई : मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना महापालिका निवडणुकिअगोदर दुसऱ्या टर्मसाठी संधी देण्यात होती. शिवसेनेविरुद्ध लढून शेलार यांच्या नेतृत्वाखलील भाजपने घवघवीत यश मिळवले, मात्र आता शेलार यांच्या जागी दुसऱ्या नेत्याला संधी देण्याबाबतच्या हालचाली भाजपच्या गोटात सुरु आहेत. मुंबई शहरावर पकड राहावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या "लाड'की व्यक्तीची निवड व्हावी यासाठी चाचपणी केली जात असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून समजते. 

शेलार यांची कामगिरी दमदार असलीतरी त्यांच्याजागी दुसरा चेहरा आणण्याच्या हालचाली सुरु आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले प्रसाद लाड हे सध्या मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील मानले जातात. अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर असताना लाड यांच्यावर महत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीनंतर मुंबई अध्यक्षपदावर दुसऱ्या व्यक्तीची निवड करायची झाल्यास मराठी चेहऱ्याचा अधिक विचार केला जाऊ शकतो.भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि पराग अळवणी यांची नांवेही चर्चेत आहेत. भातखळकर आणि अळवणी यांना संघ संस्कार आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची नाळ माहीत असल्याने त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू झाली तर मुंबईचे उपाध्यक्ष वसंत जाधव हे ही स्पर्धेत असू शकतात. 

 

संबंधित लेख