mumbai-assembly-session-vikhe-patil | Sarkarnama

सरकारच्या कामाचा पत्ता नाही; मात्र, जाहिरात देण्याची घाई : राधाकृष्ण विखे-पाटील

ब्रह्मा चट्टे
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

सरकारच्या कोणत्याही कामाचा पत्ता नाही, पण जाहिरात देण्याची घाई सरकारला आहे. सरकारच्या जाहिराती खोट्या आणि फसव्या असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. 

मुंबई : सरकारच्या कोणत्याही कामाचा पत्ता नाही, पण जाहिरात देण्याची घाई सरकारला आहे. सरकारच्या जाहिराती खोट्या आणि फसव्या असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. 

सरकारने घोषणा केल्याप्रमाणे 89 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार होती तर 36 लाख कोटींचा निधी दिला जाणार अशी सरकारने घोषणाही केली होती. मात्र फक्त 12 लाख कोटींचीच माहिती सरकारकडे आहे, असा आरोपही विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे.

विरोधी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत चहापानावर बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला. यानंतर माध्यमांशी बोलताना विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून विरोधकांनी अधिवेशनाआधीच्या मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. 

यावेळी बोलतावा विखे पाटील पुढे म्हणाले, "धर्मा पाटील या ८० वर्षीय शेतकऱ्याने विष घेण्याची घटना मंत्रालयाच्या इतिहासातील सर्वाधिक दुर्दैवी आहे. सरकारने ‘राजधर्म’ व ‘शेतकरी धर्म’ पाळला नाही. त्यामुळे धर्मा पाटलांवर ही वेळ आली. धर्मा पाटलांचा मृत्यू ही आत्महत्या नव्हे, तर सरकार व सरकारच्या दलालांनी मिळून केलेला खून आहे. बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना 22 डिसेंबरला सरकारने मदत जाहीर केली, मात्र एक पैसाही शेतकर्‍याला मिळाला नाही. तसंच केंद्र सरकार बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना मदत देऊ शकत नाही, असं केंद्रीय कृषीमंत्र्यांनी सांगितले असल्याचे आरोप विखे पाटलांनी केला आहे. तसंच याची खात्री तुम्ही एकनाथ खडसे यांच्याकडूनही करु शकता, असाही चिमटा विखेपाटलांनी सरकारला काढला. 

गारपिटीमुळे किमान 7 लाख एकर क्षेत्रावरील शेती बाधित झाली आहे आणि राज्य सरकारने केंद्राकडे फक्त 200 कोटी रुपये मागितले आहेत. केंद्राने 200 कोटी रुपये दिले तरी एका एकरला फक्त 2 हजार 787 रुपये 14 पैसे मिळतील. हे सरकार शेतकऱ्यांना मदत करतेय की भीक देतेय ? असा सवालही राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे.

संबंधित लेख