mulik gets strength in vadgaon sheri | Sarkarnama

स्टॅडिंगचे चेअरमनपद मिळाल्याने मुळिकांची ताकद वाढली 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 7 मार्च 2018

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार हे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी खराडीचा चेहरामोहरा बदलला होता. त्याचा फायदा त्यांना 2009 च्या विधानसभा निवडणुकीत झाला आणि ते विधानसभेत पोचले. आता याच पॅटर्नच्या बळावर मुळीक यांनाही आपली आमदारकी 2014 मध्ये कायम राहिल, अशी अपेक्षा आहे. मात्र त्यासाठी योगेश मुळीक यांना भरीव काम करून दाखविणे गरजेचे ठरणार आहे. 

पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी योगेश मुळीक यांची निवड झाल्याने वडगाव शेरी मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांची ताकद वाढली आहे. या वाढलेल्या ताकदीचा उपयोग त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. 

वडगाव शेरी मतदारसंघातील भागात भाजपची ताकद केव्हाच नव्हती. येथे कॉंग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने वर्चस्व राखले होते. पुण्याची उपनगरे म्हणून ओळख असलेल्या या भागात शिवसेनेचेही प्राबल्य लक्षवेधक होते. 2014 पर्यंत येथे भाजप म्हणजे काही कुटुंबापुरता मर्यादित असलेला पक्ष होता. भाजपसाठी कठीण असलेल्या काळापासून मुळीक कुटुंबाने कमळ हाती घेतले होते. त्यात 2012 मध्ये पहिल्यांदा भाजपचे नगरसेवक म्हणून योगेश मुळीक महापालिकेवर निवडून गेले होते. कमळाच्या चिन्हावर मिळालेला हा पहिलाच विजय या भागात होता. त्यानंतर 2014 मध्ये आलेल्या मोदी लाटेत निष्ठेचा फायदा झाला. त्यात जगदीश मुळीक हे आमदार झाले. 

पुण्यातील भाजपचे इतर आमदार हे 25 ते 65 हजारांच्या मताधिक्‍याने निवडून आलेले असताना मुळीक हे केवळ पाच हजारांच्या फरकाने विजयी झाले होते. यातूनच भाजपची ताकद फारशी नसल्याचा संदेश गेला होता. त्यानंतर मुळीक यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला हादरे देत भाजपची ताकद वाढवली. त्याचा उपयोग महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत झाला. भाजपचे या मतदारसंघातून 24 पैकी तब्बल 14 नगरसेवक निवडून आले. त्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे सहा, शिवसेना तीन आणि एमआयएम एक असे संख्याबळ राहिले. 

पुणे शहरातील वडगाव शेरी हा मतदारसंख्येच्या दृष्टीने सर्वांत मोठा मतदारसंघ आहे. परप्रांतीयांची मतेही येथे लक्षणीय आहेत. याचा उपयोग लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होण्यासाठी येथे भाजपची ताकद कायम राहणे गरजेचे असल्याने मुळीकांना ताकद देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे आमदार मुळीक यांनीही शहरातील इतर नेत्यांशी जुळवून घेत आपण एकाच गटाचे नसल्याचे दाखवून दिले. तसेच तरुण आमदार म्हणून मुख्यमंत्र्यांशी कायम संवाद ठेवला. त्यामुळेच योगेश यांना स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवड सुकर झाली. 

या मतदारसंघात वाहतुकीची समस्या बिकट आहे. तसेच शहराच्या इतर भागांच्या तुलनेत येथे विकासकामेही कमी झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार हे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी खराडीचा चेहरामोहरा बदलला होता. त्याचा फायदा त्यांना 2009 च्या विधानसभा निवडणुकीत झाला आणि ते विधानसभेत पोचले. आता याच पॅटर्नच्या बळावर मुळीक यांनाही आपली आमदारकी 2014 मध्ये कायम राहिल, अशी अपेक्षा आहे. मात्र त्यासाठी योगेश मुळीक यांना भरीव काम करून दाखविणे गरजेचे ठरणार आहे. 

संबंधित लेख