राफेल विमान खरेदीत देशाच्या सुरक्षेशी गद्दारी : मुकूल वासनिक
या सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे होते.
बुलडाणा : राफेल विमान खरेदी प्रकरणात नरेंद्र मोदींनी सुमारे 41 हजार कोटी रुपयांचा जनतेच्या घामाचा पैसा भांडवलदाराच्या खिश्यात घातला, असा घणाघाती आरोप अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांनी बुलडाण्यात मंगळवारी केला.
राफेल विमान खरेदी प्रकरणातील घोटाळाच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयेाजित महामोर्चामध्ये ते बोलत होते. गर्दे वाचनालयात मोर्चापूर्वी झालेल्या सभेतून वासनिक यांच्यासह काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी मोदी सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात टीकेची तोफ डागली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे, अजर हुसेन, आमदार हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश सरचिटणीस संजय राठोड, प्रदेश सरचिटणीस श्यामबाबू उमाळकर, श्री. काटोले, अॅड. जयश्रीताई शेळके, माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, पक्षनेते लक्ष्मणराव घुमरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील, अनिता रणबावरे, अलकाताई खंदारे, रमेशचंद्र घोलप, प्रसेनजीत पाटील, बलदेवराव चोपडे, स्वातीताई वाकेकर, प्रकाश घुमाळ, डॉ. देवकर यांच्यासह काँग्रेसच्या वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
वासनिक पुढे म्हणाले की, " मोदींनी चार वर्षांत एकही आश्वासन पाळलेले नाही, जागतिक बाजार पेठेत कच्चा तेलाचे भाव ढासळत असताना 200 टक्के एक्साइझ ड्यूटी वाढवून पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला पोहचविले. ज्या प्रमाणात रुपया ढासाळत आहे त्याच्या अनेक पटींनी मोदींची प्रतिमा ढासाळत आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित नाही. अनेक तडजोडी करुन हुकूमशाही पध्दतीने केलेला राफेल करार म्हणजे जनतेच्या पैशावर दिवसा ढवळ्या घातलेला दरोडा आहे. राफेलचे पहिले विमान देशात यायला सप्टेंबर 2019 उजाडेल शेवटचे विमान यायला 2022 ची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे देशाच्या सर्वोच्च सुरक्षेशी गद्दारी करणार्यांना धडा शिकवा ."