mukteshwar dhondge enters in shivsena | Sarkarnama

चिखलीकर भाजपात पोहचण्यापुर्वीच धोंडगे शिवसेनेत! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

पंकजा-जानकरांशी चर्चा! 
मुक्‍तेश्‍वर धोंडगे मंगळवारी मुंबईत होते. त्यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांची भेट घेत स्थानिक समीकरणासंबंधी चर्चा केली होती. धोंडगे हे भाजपात पंकजाताईंचे नेतृत्व मानत होते. तसेच जानकर यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. त्यांच्या भेटीनंतरच धोंडगे हे मातोश्रीवर गेले होते. 

पुणे : नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अधिकृतपणे भाजप प्रवेश केला नसलातरी त्यांनी भाजपचे काम सुरु केले आहे. त्यामुळे अस्वस्थ असलेले स्थानिक भाजप नेते ऍड. मुक्‍तेश्‍वर धोंडगे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

प्रताप पाटील चिखलीकर यांना शिवसेनेकडून मंत्रीपदाची अपेक्षा होती, मात्र ती पुर्ण झाली नाही. स्थानिक शिवसेना नेत्यांशीही त्यांचे पटत नव्हते. त्यामुळे ते भाजपच्या संपर्कात आले आहेत. नांदेड महापालिके निवडणुकीतील महत्त्वाची जबाबदारी चिखलीकरांवर देण्यात आली आहे. त्यादृष्टीने त्यांनी काम सुरु केले आहे. विविध पक्षांतील नगरसेवक फोडून त्यांना भाजपमध्ये आणले आहे. स्वत: त्यांचा भाजपप्रवेश अजून झालेला नाही. पक्षीय पातळीवरील प्रक्रिया मात्र पुर्ण झालेली आहे. चिखलीकरांना मंत्रीपदाचे आश्‍वासनही देण्यात आले आहे. याप्रकारामुळे लोह्यातील गत निवडणुकीत भाजपचे उमेदवार ऍड. मुक्‍तेश्‍वर धोंडगे यांच्यापुढे मोठे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले होते. 

धोंडगे यांना पक्षीय पातळीवर कोणताही दिलासा मिळाला नाही. गेल्यावेळी तुम्हाला तिकीट दिले होते, स्वत: मोदींनी तुमच्यासाठी सभा घेतली होती, मात्र तुमचा विजय झाला नाही, त्यामुळे आता पुढील तिकीटाचा विषय येत नाही, असे स्पष्टपणे त्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे धोंडगेंनी पर्यायांचा शोध सुरु केला होता. चिखलीकर शिवसेनेतून भाजपत जाणार असल्याने शिवसेनेलाही तगडे स्थानिक नेतृत्व हवे होते. त्याप्रमाणे ऍड. धोंडगे त्यांच्याकडे आले. यासंदर्भात पालकमंत्री अर्जुन खोतकर, आमदार हेमंत पाटील यांनी महत्त्वपुर्ण भूमिका निभावली. 

मुंबईत मातोश्री येथे ऍड. धोंडगे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला. ठाकरे यांनी स्वत: धोंडगेंना शिवबंधन बांधले, तसेच भगवा खांद्यावर दिला. यावेळी मंत्री रामदास कदम, मंत्री खोतकर, आमदार पाटील उपस्थित होते. 

 

संबंधित लेख