mubai latur train | Sarkarnama

मुंबई-लातूर रेल्वेच्या विस्ताराने वादावादी 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 एप्रिल 2017

लातूर :   मुंबई-लातूर-मुंबई ही एक्‍स्प्रेस रेल्वेगाडी कर्नाटकातील बिदरपर्यंत वाढविण्यात आल्याने लातूर विरुद्ध कर्नाटक असा नवा वाद सुरू झाला आहे. यशवंतपूर- बिदर ही नवी रेल्वे सुरू करण्याचे गाजर दाखवून लातूरच्या हक्काची रेल्वे कर्नाटकने पळवल्याचा आरोप लातूरकर करत आहेत. तर बिदर पर्यंत लातूर एक्‍स्प्रेसचे विस्तार झाल्याने उदगीरकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लातुरात मात्र या निर्णयाच्या विरोधात आंदोलन सुरू झाले आहे. 

दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून कुर्डुवाडी ते लातूररोड हा लोहमार्ग तयार झाला. रेल्वे मंत्रालयाने खूप वर्षे घेतल्यानंतर शेवटी राज्य सरकारच्या रोजगार हमी योजनेच्या निधीतून या मार्गाचे काही काम करावे लागले. त्यानंतर अथक प्रयत्नांनी लातूरसाठी एक्‍स्प्रेस सुरू झाली. त्यामुळेच लातूरकर मुंबई- लातूर रेल्वेगाडीवर हक्क सांगतात. आधीच दुप्पट प्रवासी घेऊन जाणारी ही गाडी आता बिदरपर्यंत वाढवण्यात आल्याने लातूरकरांना यात किती जागा मिळणार हा खरा प्रश्‍न आहे. याच गाडीला आणखी डब्बे वाढवण्यासह लातूर- पुणे इंटरसिटी, लातूर-यशवंतपूर व लातूर- तिरुपती तसेच हैदराबाद इंटरसिटी रेल्वे सुरू करण्याची लातूरकरांची मागणी होती. यावर कुठलाही विचार न करता मुंबईहून निघणारी लातूर एक्‍स्प्रेस मात्र बिदरपर्यंत वाढवण्याचा झटपट निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला. या विरोधात स्थानिक राजकीय पक्ष, संघटना व नागरिकांनी निदर्शने, उपोषण, धरणे व मोर्चाद्वारे आंदोलन छेडले आहे. 
लातूर विरुद्ध उदगीर 
बिदरपर्यंत लातूर एक्‍स्प्रेसचा विस्तार झाल्यामुळे उदगीर व परिसरातील प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे अहमदपूर, चाकूर, उदगीर, शिरूर अनंतपाळ, देवणी व जळकोटच्या नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले. मुंबई - लातूर रेल्वेमुळे कर्नाटकातील प्रवाशांची देखील मुंबईला जाण्याची सोय झाली. याचा आनंद असला तरी लातूर जिल्हा दुभंगल्याचे चित्र या निर्णयामुळे निर्माण झाले आहे. लातूरकर विरुद्ध उदगीरकर एकमेकाच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले असून यशवंतपूर- बिदर रेल्वेगाडीचा लातूरपर्यंत विस्तार केल्यास या वादावर पडदा पडू शकेल. 

संबंधित लेख