MTDC Trambakeshwar Resort | Sarkarnama

भाडे 17 लाख, सजावट 1.70 कोटींची - पर्यटन महामंडळाचा त्र्यंबकेश्र्वर रिसाॅर्ट घोटाळा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 मे 2017

सिंहस्थ म्हणजे हाॅटेल व्यवसायास संधीचे दिवस. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने मात्र ही संधी खासगी व्यवसायिकांना उपलब्ध करण्याचा घाट घातला आणि त्र्यंबकेश्र्वर येथील रिसाॅर्ट व उपहारगृह 16.92 लाख रुपये वार्षिक भाडयाने दिले. खासगी व्यवसायिकाला हस्तांतर केल्यावर त्याच्या नुतनीकरणावर भाड्याच्या तब्बल दहापट म्हणजे 1.70 कोटी खर्च केले. गंमत म्हणजे सिंहस्थ संपल्यावर व्यवसायिकाने ते परवडत नसल्याचे निमित्त करुन भाडे न देताही स्वतःकडेच ठेवल्याचा प्रकार आता उघडकीला आला आहे.

मुंबई - सिंहस्थ म्हणजे हाॅटेल व्यवसायास संधीचे दिवस. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने मात्र ही संधी खासगी व्यवसायिकांना उपलब्ध करण्याचा घाट घातला आणि त्र्यंबकेश्र्वर येथील रिसाॅर्ट व उपहारगृह 16.92 लाख रुपये वार्षिक भाडयाने दिले. खासगी व्यवसायिकाला हस्तांतर केल्यावर त्याच्या नुतनीकरणावर भाड्याच्या तब्बल दहापट म्हणजे 1.70 कोटी खर्च केले. गंमत म्हणजे सिंहस्थ संपल्यावर व्यवसायिकाने ते परवडत नसल्याचे निमित्त करुन भाडे न देताही स्वतःकडेच ठेवल्याचा प्रकार आता उघडकीला आला आहे. राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क खात्यातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचाही या साऱ्या व्यवहाराशी संबंध असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

सिंहस्थ कुंभमेळा हा जागतिक महोत्सव म्हणून पाहिला जातो. शहरातील हाॅटेल या काळात भरलेली असतात. व्यवसायिक संधी म्हणून अनेकांची त्यात भरभराट झाली आहे. मात्र, अत्यंत नयनरम्य परिसर, उत्तम आल्हाददायक हवामान व चहुबाजूंनी ब्रम्हगिरी व सह्याद्रीचे पर्वत अन् पावसाळ्यात सुसाट वा-यांमुळे आकाशाकडे धावणारे धबधबे असा प्रसन्न परिसर असलेल्या या भागातील रिसाॅर्ट पर्यटन महामंडळाने सिंहस्थाच्या आधी नाशिकच्याच संस्कृति हाॅलीडे रिसाॅर्ट या संस्थेला 16.92 लाख रुपये वार्षिक भाडे तत्वावर दिले. ज्याला भाड्याने दिले त्या व्यक्तीचे वडील राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या सेवेत वरिष्ठ पदावर आहेत.

त्याचा करार झाल्यावर नऊ महिन्यांनी महामंडळाने अचानक त्याची अंतर्गत सजावट व दुरुस्तीच्या कामासाठी म्हणून दाखवुन 1.70 कोटींचा खर्च केला. जे रिर्सोट आपल्या ताब्यातच नाही त्यात एवढ्या मोठ्या रकमेची सजावट केली गेलीच कशी, हा गंभीर प्रश्न आता उपस्थित होतो आहे. 2014 आणि 2015 हा सिंहस्थाचा कालावधी होता. त्यात देशभरातून लाखो भाविक येथे येऊन गेले. त्यानंतर 2016 मध्ये संबंधितांनी 'परवडत नाही' या कारणास्तव रिसाॅर्ट परत करत आहोत असे महामंडळाला सांगितले. प्रत्यक्षात त्यानंतरही त्याचा ताबा 'त्या' खासगी संस्थेकडेच राहिला. त्यावर महामंडळाने काहीच हरकत का घेतली नाही, असा आक्षेप एका चौकशीत नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटन महामंडळाचे तत्कालीन अधिकारी अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे 'ब्रॅंडींग' करण्याची जबाबदारी पर्यटन विकास महामंडळाकडे होती. देश, विदेशातून कोट्यवधी भाविक आले. मात्र, त्याबाबत सिंहस्थ आराखडा तयार केला गेला तेव्हा या महामंडळाकडे कोणतीच योजनाच नसल्याचे लक्षात आल्याने यातील बरेचसे काम माहिती व प्रसारण विभागाला करावे लागले होते. पर्यटन महामंडळाने बसस्थानकांवर एका व्यावसायिक संस्थेच्या माध्यमातून पत्रके वाटण्याचे जुजबी काम केल्याने हे महामंडळ नक्की काय व कोणते काम करते असा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

आता रिसाॅर्टच्या उघडकीला आलेल्या गोंधळावर केंद्र शासनाच्या 'कॅग'नेच ताशेरे ओढले आहेत. कॅगच्या ताज्या अहवालात त्याबाबत आक्षेप नोंदविण्यात आल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे.

संबंधित लेख