काॅंग्रेसचे पाच कार्याध्यक्ष थोरतांच्या मदतीसाठी की पायात पाय घालण्यासाठी?

काॅंग्रेसचे पाच कार्याध्यक्ष थोरतांच्या मदतीसाठी की पायात पाय घालण्यासाठी?

पुणे : महाराष्ट्रातील काँग्रेसला हात देण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. थोरात यांच्या मदतीला पक्षाने पाच कार्याध्यक्ष नेमले आहेत. काॅंग्रेसच्या संस्कृतीनुसार हे पाचजण थोरातांना मदत करण्यासाठी नेमले आहेत की त्यांच्या पायात पाय घालण्यासाठी आहेत, असा सवाल आगामी काळात उपस्थित होऊ शकतो.

थोरात यांचे हात मजबूत करण्यासाठी दिल्लीतील काँग्रेसच्या पक्षनेतृत्वाने पाच कार्याध्यक्षांची नियुक्ती केली. त्यात विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, डॉ. नितीन राऊत, मुझफ्फर हुसेन व बसवराज पाटील यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. यात विविध समाजघटकांना स्थान देण्यात आले आहे.

माणिकराव ठाकरे प्रदेशाध्यक्ष असताना 2008 मध्ये जयवंतराव आवळे यांच्यावर काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर तब्बल 11 वर्षांनी एकाच वेळेस पाच कार्याध्यक्ष दिले आहेत. पण पाच कार्याध्यक्षांची कामाची पद्धत व विचार करण्याची पद्धत वेगळी असल्याने पाच जणांचे एकमत करण्याचे नव्या प्रदेशाध्यक्षांसमोर मोठे आव्हान निर्माण होण्याची चिन्हे आहेत. काॅंग्रेसमध्ये कधीच कोणाला एकहाती सत्ता दिली जात नाही. एकमुखी नेतृत्त्व नसल्याचे फायदे आहेत. तसेच तोटेही आहेत. पक्षाची निर्णयक्षमता सामूहिक नेतृत्त्वामुळे मार खाते, असा अनुभव आहे. यातून थोरात कसा मार्ग काढणार हे आगामी काळात दिसेल. 

पक्षनेतृत्वाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वेगवेगळ्या समित्याही स्थापन केल्या आहेत. अशा वेळेस प्रदेशाध्यक्षांना निवडणुकीचे उमेदवार निश्चित करण्याची प्रमुख भूमिका पार पाडावी लागणार आहे. उमेदवार निवडीपूर्वी पाच कार्याध्यक्षांची मते विचारात घ्यावी लागेल.

मंगळवारच्या बैठकीकडे लक्ष

राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून काँग्रेस पक्ष अजूनही सावरलेला नाही. वास्तविक प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्याचा मोठा सोहळा काँग्रेसमध्ये असतो. पण थोरात यांच्याकडे वेळ फार कमी आहे. येत्या 16 जुलैला काँग्रेसची जागावाटपाची महत्त्वाची बैठक आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात या आव्हानांचा कसा सामना करतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com