mp sanjay patil supports wrestlers family | Sarkarnama

खासदार संजय पाटलांनी रामापुरात दिलेला शब्द खरा केला!

संपत मोरे
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

मूळचे पैलवान असलेले संजय पाटील संकटाच्या काळात पैलवानांच्या कुटुंबाच्या सोबत राहिले.

पुणे : जानेवारी महिन्यात वांगीजवळ पैलवानांच्या गाडीला अपघात होऊन पाच पैलवानांचा मुत्यु झाला होता. हे पैलवान गरीब कुटुंबातील होते. या पैलवानांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून खासदार संजय पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

या पाठपुराव्याची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. याबाबतचे पत्र सहायक संचालक सुभाष नागप यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.

सातारा जिल्ह्यातील औंध येथील कुस्त्या आटोपून कुंडलच्या दिशेनं निघालेल्या पैलवानाच्या गाडीला वांगीजवळ अपघात झाला. या अपघातात शुभम अंकुश घार्गे, अविनाश सर्जेराव गायकवाड, विजय शिवाजी शिंदे आणि गाडीचा चालक रणजित धनवडे हे सांगली जिल्ह्यातील तर सौरभ अनिल माने, आकाश दादासो देसाई हे सातारा जिल्ह्यातील पैलवानांचा मृत्यू झाला होता. 

हे पैलवान सांगली जिल्ह्यातील कुंडल येथील तालमीत सराव करत होते. या पैलवानांच्या कुटुंबास क्रांतीअग्रणी कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत केली आहे.
 

या पैलवानांच्या कुटुंबास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी खासदार संजय पाटील आणि जिल्हा परिषदेचे सदस्य शरद लाड यांनी केली होती. त्यांनी याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला होता. आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच पैलवान आणि चालक यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर झाल्याचे पत्र सहायक संचालक सुभाष नागप यांनी जिल्ह्याधिकारी सातारा आणि सांगली यांना दिले आहे.

पैलवानांच्या मृत्यूनंतर खासदार संजय पाटील जेव्हा रामापूरमध्ये विजय शिंदे यांच्या कुटुंबाची भेट घ्यायला आले होते. तेव्हा त्यानी, 'मी आयुष्यभर तुमच्या सोबत आहे' असा आधार देत सांत्वन केले होते. तो शब्द त्यांनी खरा केला. मूळचे पैलवान असलेले संजय पाटील संकटाच्या काळात पैलवानांच्या कुटुंबाच्या सोबत राहिले. लाल मातीतला खासदार पैलवान संकटाच्या काळात पैलवानाच्या आई वडिलांच्या मागे खंबीरपणे उभा राहिला, अशी भावना कुस्ती प्रेमी व्यक्त करत आहेत.
 

संबंधित लेख