वेळ आलीतर खासदार संजय पाटील काय चीज आहे, दाखवावे लागेल!

वेळ आलीतर खासदार संजय पाटील काय चीज आहे, दाखवावे लागेल!

दिवंगत नेते, माजी मंत्री शिवाजीराव शेंडगे यांच्या प्रतिमेचे पूजन, आरेवाडीतील बिरदेव मंदीरासाठी पंधरा कोटींची घोषणा आणि धनगर समाजाला आरक्षण देणारच, अशी गर्जना करत भाजपने आज नागज मुक्कामी धनगर समाजात साखरपेरणी केली.

या मुद्यावरून भाजप आणि खासदार संजय पाटील यांच्यावर सतत टोकाची टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता खासदार पाटील यांनी "वेळ आली तर खासदार संजय पाटील काय चीज आहे दाखवावे लागेल' अशा शब्दांत इशारा दिला.

बिरोबा बनाच्या शेजारी वचनपुर्ती मेळाव्यात सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीची वात पेटवली गेली. 
आरेवाडीपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या नागज मुक्कांमी भाजपचा वचनपुर्ती मेळावा आयोजित करून खासदार पाटील यांनी दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. 

सांगली लोकसभा मतदार संघात धनगर समाजाची मतपेटी मोठी आहे. आरक्षणाच्या मुद्यावर समाज आक्रमक होतोय आणि त्याला भाजपविरोधी झालर देण्याचा प्रयत्नही ताकदीने सुरु आहे. अशावेळी धनगर समाजात साखर पेरणीचा निर्धार करूनच संजय पाटील यांनी डावपेच आखले आणि ते करूनही दाखवले. कॉंग्रेस, राष्ट्रवादीत आयुष्य घालवलेल्या माजी मंत्री शिवाजीराव शेंडगे यांची आज पुण्यतिथी. त्यांची मोठी प्रतिमा भाजपच्या व्यासपीठावर पुजली गेली. शेंडगेपुत्र प्रकाश सध्या भाजप विरोधी रान उठवत असताना त्यांचे बंधू रमेश यांना भाजप व्यासपीठावर आणले गेले. आरेवाडीतील बिरदेव मंदीरासाठी पाच कोटी मिळालेत आणि पंधरा कोटी द्या, अशी मागणी खासदार संजय पाटील यांनी केली आणि त्याला तत्काळ होकारार्थी मान हलवत मुख्यमंत्र्यांनी भाषणात घोषणाही करून टाकली. धनगर समाजाला आरक्षण दिले जाईलच, त्याबद्दल शंका नसावी, अशी ग्वाही दिली. सोबतच धनगर आरक्षणासाठी बारामतीत आंदोलन सुरु असताना बारामतीचे नेते तेथे का फिरकले नव्हते, असा सवाल करत दिवंगत आर. आर. आबांच्या गडात खळबळ माजवून सोडली. 
या साऱ्या धामधुमीत संजयकाकांनी मोठ्या जमावासमोर आपली दबंग स्टाईल दाखवण्याची संधी साधली. अगदी कालपर्यंत गोपीचंद पडळकर यांना "द्या सोडून, कुणाचं मनावर घेताय', असे सांगणारे संजयकाका म्हणाले, "टीका करणाऱ्यांची कुवत काय, ऐपत काय, माहिती आहे. संजय पाटील काय चीज आहे, तुम्हाला माहिती आहे. कुणी विचलित करतेय म्हणून आपण भांडण काढायचे नाही, मात्र त्यांनी मर्यादा ओलांडली तर बघून घेऊ.'' 
संजयकाकांचा हा अवतार पाहून खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सबुरीनं घेण्याचा सल्ला दिला. कुणी काय म्हणतोय, याकडे लक्ष देऊ नका. कामाच्या माध्यमातून लोकांसमोर जा, लोक आपल्या सोबत आहेत, असे सांगत त्यांनी "पार्टी वुईथ डिफरन्स'ची आठवण करून दिली. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com