mp sanjay patil kundal kusti maidan | Sarkarnama

संजय पाटील अगोदर पैलवान आहेत आणि मग खासदार!

संपत मोरे 
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

कुंडलच्या कुस्ती मैदानाची वेगळी ओळख राज्यभर आहे. त्या मैदानासाठी दहा लाखाची मदत जाहीर करून पाटील यांनी कुस्ती आणि राजकारण दोन्ही आखाडे जिंकले आहेत. 

पुणे : खासदार संजय पाटील जेव्हा कुस्ती मैदानाला भेट दयायला येतात तेव्हा कुस्ती निवेदक शंकर पुजारी त्यांच्या खास शैलीत पुकारतात "आता याठिकाणी पैलवान संजय पाटील आलेत. होय अगोदर पैलवान आणि मग खासदार. एक पैलवान आज खासदार होऊन येतोय याचा तमाम कुस्तीशौकिनांना अभिमान आहे." 

संजय पाटील यांच्यातील पैलवान काल कुंडलच्या कुस्तीमैदानावर जागा झाला.त्यांनी कुंडलच्या कुस्ती मैदानाला दहा लाख रुपये जाहीर करून स्वतःचे कुस्तीप्रेम दाखवून दिले. त्यांनी एकाचवेळी कुस्ती आणि राजकारण दोन्ही आखाड्यात बाजी मारली. कॅबेनीट मंत्रीपदाचा दर्जा मिळाल्यानंतर ते पहिल्यांच कुंडलला गेले होते. यावेळी कुस्ती समितीने त्यांचे जोरदार स्वागत केले. 

पाटील यांचे आजोबा जोतिरामदादा सावर्डेकर  देशभर गाजलेले पैलवान होते. दुसरे आजोबा विष्णूपंत सावर्डेकर यांना तर कुस्तीतले जादूगर म्हटले जाई. आजोळचा हा कुस्तीचा वारसा संजय पाटील यांनी जपला. त्यांनी तरुणपणात भोसले व्यायामशाळेत कुस्तीचे धडे घेतले आहेत. कुस्तीनंतर ते राजकीय आखाड्यात उतरले पण कुस्तीवरचे प्रेम कायम राहिले. त्यांनी सराव करताना अनेक गरीब पैलवानांना मदतही केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या कुस्तीतील मित्रपरिवार मोठा आहे. ते विधानपरिषद सदस्य असतानाही त्यांनी कुस्तीला चालना दिली. तालीम उभारण्यासाठी फंड दिले. काही पैलवानाना व्यक्तिगत मदत केली आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख