कॉंग्रेसवाल्यांचे कौतुकसोहळे संजयकाकांना पुन्हा लोकसभेत पाठविणार? 

कॉंग्रेसवाल्यांचे कौतुकसोहळे संजयकाकांना पुन्हा लोकसभेत पाठविणार? 

विटा (सांगली) :"मला लोकसभेच्या निवडणुकीत सर्वच पक्षातील लोकांनी मदत केली आहे. आज कॉंग्रेसच्या लोकांचे आणि माझे एकत्रित सत्कार होत आहेत. राष्ट्रवादीचे लोकही सत्कारासाठी बोलावत आहेत. कॉंग्रेसचे जेष्ठ नेतेही माझे कौतूक करत आहेत. तसे पाहिले गेलं तर मीच नशिबवान कार्यकर्ता आहे", असे विधान भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी केले. 

लोकसभेच्या निवडणुकीत सांगली मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून संजय पाटील मोठया मताधिक्‍क्‍याने विजयी झाले होते. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षाच्या लोकांनी काही छुप्या तर काहींनी उघड पद्धतीने संजयकाकांना मदत केली होती, याची जाहीर कबुली त्यांनी विट्यातील कार्यक्रमात दिली. 

विशेष म्हणजे विटा नगरपालिकेच्या वतीने कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अँड. सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विटा नगरपालिका ही कॉंग्रेसच्या ताब्यात असणारी सांगली जिल्ह्यातील एकमेव नगरपालिका आहे. त्यामुळे एक प्रकारे कॉंग्रेसच्याच व्यासपीठावर भाजप खासदारांचा सत्कार असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. 

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर व त्यांच्याच समर्थक खानापूर पंचायत समितीच्या सभापती मनीषा बागल यांनीही मुंबईत खासदार संजयकाका पाटील यांचा सत्कार केला होता. तर कृष्णा खोरे महामंडळाच्या निवडीनंतर संजयकाकांनी कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या समाधीचे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वडील स्व. राजारामबापू पाटील यांच्या समाधीचे दर्शन तसेच राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष शरद लाड यांचे आजोबा स्वातंत्र्यसेनानी स्व. जी. डी. लाड यांच्याही समाधीला अभिवादन केले होते. या पार्श्वभूमीवर "सर्वच पक्षातील लोकांनी निवडणुकीत मदत केली आणि सर्व पक्षातील लोक सत्कारालाही बोलावत आहेत," या संजयकाकांच्या वक्तव्याला एक प्रकारे पुष्टीच मिळाली आहे. परंतु निवडणूकीपुरते राजकारण केले पाहिजे. त्यानंतर समाजकारणाला प्राधान्य दिले पाहिजे, असे सांगायला ही संजयकाका विसरले नाहीत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com