पाच कार्यकर्तेही मागे नसलेल्या जावडेकरांना तर `बंपर लाॅटरी` : खासदार संजय काकडेंचा टोला

भाजपचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी आता थेट भाजप नेत्यांना लक्ष्य केले असून केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री यांनी केलेल्या टिकेला आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे.
पाच कार्यकर्तेही मागे नसलेल्या जावडेकरांना तर `बंपर लाॅटरी` : खासदार संजय काकडेंचा टोला

पुणे : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचा निवडणूक अंदाज म्हणजे मटका अशी संभावना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केल्यानंतर काकडे यांनी पलटवार केला आहे. पाच कार्यकर्ते आणि एकही नगरसेवक निवडून आणण्यासाठी पक्षाला उपयोग नसलेल्या जावडेकर यांना मोदींच्या कृपेमुळे कॅबिनेट मंत्रिपदाची तर बंपर लाॅटरी लागली आहे, असा टोला लगावला आहे.  

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती झाली नाही तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पराभव होणार असल्याचे नवे भाकीत काकडे यांनी वर्तवले होते. त्यावरून राजकीय वाद पेटला आहे. पुण्यातील भाजपने काकडे यांचा निषेध केला. दुसरीकडे दानवे यांचे कट्टर समर्थक राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी काकडे यांचे भविष्य खरे ठरणार असल्याची ग्वाही दिली.

या ग्वाहीनंतर आता भाजपचे नेतेही काकडे यांच्या वक्तव्यावर टीका करू लागले आहेत. जावडेकर यांना आज पुण्यात या बाबत प्रश्न विचारला असता मी असल्या भाकीतांवर बोलत नाही', असे सांगत यावर अधिक भाष्य करणे जावडेकर यांनी टाळले. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत खासदार काकडे यांचे आकडे खरे ठरले होते, असे पत्रकारांनी त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर  'मटका लागला म्हणजे काही होत नाही,' अशी टीका केली.

या उत्तरावर काकडे यांनीही आक्रमक प्रत्युत्तर देत थेट जावडेकर यांच्यामागे किती कार्यकर्ते आहेत, असा हिशोब विचारला आहे. जावडेकर यांच्यामागे पाच कार्यकर्ते नाहीत. त्यांना पुण्यात एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही. त्यांचा पक्षाला काहीही उपयोग नाही. तरी मोदी साहेबांच्या कृपेमुळे आणि पक्षामुळे ते कॅबिनेट मंत्री बनले, हे त्यांनी विसरू नये. बिनउपयोगाचे असताना पद मिळणे यालाच बंपर लाॅटरी म्हणतात, याचेही विस्मरण जावडेकर साहेबांनी होऊ देऊ नये, एवढीच अपेक्षा असल्याचे काकडे यांनी म्हटले आहे. माझा अंदाज, हा सर्व्हे आहे की मटका, हे २०१९ च्या निवडणूक जावडेकर साहेबांना कळेल, असाही दावा काकडे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com