MP Sanjay Dhotre group pressing on farm waive loan marketing | Sarkarnama

कर्जमाफीच्या निर्णयाचे खासदार धोत्रे गटाकडून जोरदार मार्केटींग 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 जून 2017

"शेतकऱ्यांच्या वेदना, संवेदना समजून कर्जमुक्ती करावी तसेच शाश्वत शेती समृद्ध शेतकरी निर्माण करण्यासाठी योजना आखण्यासंदर्भात गेल्या वीस वर्षापासून आग्रही भूमिका घेत आहेत. कर्जमाफी करताना शेतकऱ्यांची व्याख्या करा व खऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्या, या खासदार संजय धोत्रे यांच्या भूमिकेची राज्य सरकारने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार धोत्रेंच्या विचाराला सहमत होऊनच कर्जमाफीचा निर्णय घेतला,' असे जोरदार मार्केटींग खासदार धोत्रे गटाकडून करण्यात येत आहे. 

अकोला : "शेतकऱ्यांच्या वेदना, संवेदना समजून कर्जमुक्ती करावी तसेच शाश्वत शेती समृद्ध शेतकरी निर्माण करण्यासाठी योजना आखण्यासंदर्भात गेल्या वीस वर्षापासून आग्रही भूमिका घेत आहेत. कर्जमाफी करताना शेतकऱ्यांची व्याख्या करा व खऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्या, या खासदार संजय धोत्रे यांच्या भूमिकेची राज्य सरकारने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार धोत्रेंच्या विचाराला सहमत होऊनच कर्जमाफीचा निर्णय घेतला,' असे जोरदार मार्केटींग खासदार धोत्रे गटाकडून करण्यात येत आहे. 

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मुद्यावर रान पेटले असतांना नुकताच राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. कर्जमाफीचा निर्णय होण्याआधीच अकोल्यात गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील गटाकडून कर्जमुक्ती केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभाराचे पोस्टर लावले होते. मात्र, निर्णय होण्याआधीच शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा हा प्रकार असल्याचे म्हणत शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी शहरातील भाजपचे पोस्टर फाडले होते. त्यानंतर गृहराज्यमंत्री विरुद्ध शिवसेना यांच्यात पाणचट राजकारण कुणाचे? यावरून राजकीय वाद रंगला. भाजपमधील काही नेत्यांच्या इशाऱ्यावर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून गृहराज्यमंत्र्यांचे पोस्टर फाडण्यात आले, असा गृहराज्यमंत्री गटाकडून सोशल मिडीयावर प्रचार करण्यात आला. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत कुरघोडीचे राजकारण अधिकच रंगात आले. 

आता खासदार संजय धोत्रे गटाकडून कर्जमाफीच्या निर्णयाचे जोरदार मार्केटींग करण्यात येत आहे. आघाडी सरकारच्या काळात बोगस शेतकऱ्यांना लाभ देऊन खऱ्या पात्र शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आल्याचा हल्लाबोल खासदार संजय धोत्रे यांच्याकडून करण्यात येत आहे. कर्जमाफी करताना शेतकऱ्यांची व्याख्या करा व त्यांनाच लाभ द्या, अशी भूमिका खासदार संजय धोत्रे यांनी वारंवार मांडली आहे. त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाने व शेतकरी कृती समितीने शेतकरी कर्जमाफींचा निर्णय झाल्याचे मार्केटींग खासदार धोत्रे गटाकडून करण्यात येत आहे. 

संबंधित लेख