mp sambhajiraje on karjmafi | Sarkarnama

"फडणवीसांच्या कर्जमाफी'ला संभाजीराजेंचा पाठिंबा ! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 जून 2017

रायगडावर बारा वर्षापासून शिवराज्याभिषेक साजरा होतोय. दरवर्षी गडावरील गर्दी वाढत आहे. शिवगौरवाबरोबरच हा एक प्रकारे मराठा अस्मितेचा उत्सव बनला आहे. त्यामुळेच राजकीय दृष्टीकोनातूनही या कार्यक्रमाचे मोजमाप होते. संभाजीराजेंच्या येथील भाषणालाही महत्त्व आहे आणि त्यांनी फडणवीसांच्या समर्थनाचा संदेश अप्रत्यक्ष कां होईना महाराष्ट्राला दिला आहे. 

पुणे : कर्जमाफीचा निर्णय घेत असताना शेतकऱ्यांत फूट पाडत असल्याबद्दल राज्यभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला जात असताना राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभा सदस्य झालेले संभाजीराजे छत्रपती यांनी फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचे समर्थन केले आहे. आजपर्यंत किती बोक्‍यांनी कर्जमाफी लाटली, असे रायगडावर वक्‍तव्य करत फडणवीस यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या मांडणीची एकप्रकारे पाठराखण केली आहे. 

संभाजीराजे यांनी 2009 ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लढविली होती. यात पराभव झाल्यानंतर मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड या संघटनांच्या माध्यमातून राज्यभर दौरे करुन आपला जनाधार वाढविली. त्यांची मांडणी भाजप विचारांच्या विरोधात होती, मात्र भाजपकडून पक्षात येण्यासाठी त्यांना वारंवार संपर्क करण्यात येत होता. मात्र थेट पक्षात प्रवेश न करता सहकार्य करण्याचे धोरण त्यांनी अवलंबविले. गतवर्षी रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावले. पुढे दोन तीन दिवसांत राष्ट्रपती कोट्यातून संभाजीराजे राज्यसभेवर गेले. उत्तर प्रदेशात झालेल्या भाजपच्या बैठकीत त्यांचा सत्कारही झाला. मात्र आपण भाजपमध्ये प्रवेश केला नसल्याचे संभाजीराजे सातत्याने सांगत आले आहेत. प्रत्यक्षात त्यांची कृती भाजपला पूरक अशीच होत आहे. 

राज्य पातळीवर भाजपने शक्‍य तेवढी मान, प्रतिष्ठा संभाजीराजे यांना दिली आहे. फडणवीस यांनी किल्ले संवर्धन मोहिमेचे ब्रॅंड अम्बेसेडर त्यांना बनवले आहे. रायगड किल्ल्याला 125 कोटी दिले आहेत. ही कामे प्रगतीपथावर असताना संभाजीराजे अप्रत्यक्ष कां होईना भाजपला सोयीची भूमिका घेताना दिसत आहेत. नुकताच, दि. 6 जून रोजी रायगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात त्यांनी अल्पभूधारकांच्या कर्जमाफीचे समर्थन केले. बोके कर्जमाफी लाटतात, असे सांगत फडणवीसांची री ओढली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हवे तर आणखी कर्ज काढा, अशी सूचनाही त्यांनी केली. किल्ले संवर्धनाबाबतही ते बोलले. शेतकरी विरुद्ध फडणवीस सरकार यांच्यात सुरु असलेल्या संघर्षावर थेट नाव घेऊन ते बोलले नसलेतरी त्यांनी आपला कल स्पष्ट केला आहे. 

 

संबंधित लेख