mp dilip gandhi's diwali | Sarkarnama

चाहत्यांमध्ये रममान होणाऱ्या खासदार दिलीप गांधींची फटाकेमुक्त दिवाळी

मुरलीधर कराळे
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

खासदार झाल्यापासून दिवाळीचा आनंद काही वेगळाच

नगर : भाजपचे खासदार दिलीप गांधी दिवाळीच्या काळात आपले कुटुंब, संस्था आणि चाहत्यांमध्ये रममान होऊन जातात. योजनांचे प्रदर्शन, सांस्कृतिक महोत्सव भरवतात. यंदा महापालिकेच्या आचारसंहितेमुळे योजनांचे प्रदर्शन होणार नसले, तरी सांस्कृतिक महोत्सव भरवून स्थानिक कलाकारांना ते व्यासपीठ निर्माण करून देणार आहेत. तसेच फटाकेमुक्त दिवाळी साजरी करून इतरांनाही ते प्रेरणा देतात.

खासदार गांधी यांच्या पत्नी सरोज यांची आठवडाभर लगबग सुरू असते. बहुतेक फराळ घरीच करतात. त्यांच्या मोठ्या स्नुषा प्रगती व मिथाली त्यांना मदत करतात. खासदारांचा मोठा मुलगा देवेंद्र व लहान मुलगा नगरसेवक सुवेंद्र यांचीही दिवाळीनिमित्त घर सजावटीसाठी धावपळ सुरू असते. देवेंद्रची मुले राजवीर आणि वेदिका, सुवेंद्रची मुले जस्वील व इशान ही खासदारांची नातवंडांची खरेदी लवकर उरकलेली असते. खासदारांची सासरी गेलेली मुलगी स्मिता स्वानंद नवसरेकर यांच्या येण्याची उत्सुकता सर्वच कुटुंबाला असते. हे सर्वच कुटुंब एकत्रितपणे दिवाळी साजरी करतात. त्यामध्ये खासदार गांधी यांचे बंधू अशोक गांधी व त्यांचेही कुटुंबिय सहभागी होतात.

खासदार गांधी हे नगर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे बॅंकेच्या कारभाराची जबाबदारीही त्यांना सांभाळावी लागते. साहजिकच बॅंकचे सर्व कर्मचारीवृंद व त्यांच्या कुटुंबियांच्या आनंदात खासदार गांधी रममान होतात. राजकारण करताना कुटुंबाला खूप वेळ देता येत नसला, तरी दिवाळीच्या काळात कुटुंबियांसमवेत जास्त वेळ आवर्जून घालण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

माझे कुटुंब एकत्रित येवून फराळ उत्सव साजरा करते. एकमेकांना फराळ भरवितो. पत्नी, मुले, सुना, नातवंडे यांच्यासोबत माझे बंधू व त्यांचे कुटुंबिय या आनंदोत्सवात सहभागी होतात. अर्बन बॅंकेचे कर्मचारी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांसाठीही फराळ पार्टीचे आयोजन केले जाते. आम्ही सर्व फटाकेमुक्त दिवाळी साजरी करतो. प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी ते आवश्यक आहे. इतर पदाधिकाऱ्यांनाही फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यास प्रोत्साहित करतो. गरीब, वंचितांना शक्य ती फराळाची मदतही आमच्या कुटुंबाच्या वतीने केली जाते. एकूणच खासदार झाल्यापासून दिवाळीचा आनंद काही वेगळाच असतो, असे खासदार दिलीप गांधी यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

संबंधित लेख