mp dilip gandhi about ram mandir | Sarkarnama

आम्ही भाजपवाले सर्वजण रामभक्त : गांधी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

नरेंद्र मोदी हेच राममंदिर पूर्ण करतील.

नगर : राम मंदिराचा मुद्दा सर्वप्रथम भाजपनेच पुढे आणला आहे. आम्ही भाजपाचे सर्वजण पूर्वीपासूनच रामभक्त आहोत. कोणत्याही कामाची सुरुवात जय श्रीराम नावाचा जयघोष करून करत असतो. त्यामुळे आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच राममंदिर पूर्ण करतील, असा विश्वास व्यक्त करीत भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी शिवसेनेला चिमटा काढला.

पत्रकार परिषदेत गांधी म्हणाले, लालकृष्ण अडवाणी यांनी प्रथम राममंदिराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे आगामी काळातही भाजप हाच पक्ष हा विषय तडीस नेणार आहे. कोणी कितीही काहीही केले, तरीही शेवटी भाजपच या विषयाचा शेवट करील.
 
महापालिकेच्या प्रचारासाचा प्रारंभ रविवारी (ता. २५) सायंकाळी सात वाजता भिस्तबाग येथे होणार आहे. या वेळी भाजपचे सर्व ६८ उमेदवार उपस्थित राहतील. या वेळी पालकमंत्री राम शिंदे, प्रदेश सरचिटणीस विजय पुराणिक, महापालिका प्रभारी सुजितसिंग ठाकूर आदी उपस्थित राहणार आहेत.  

दरम्यान, केडगावमध्ये भाजपचे काही कार्यकर्ते नाराज असले, तरी त्यांची समजूत काढलेली आहे. त्यामुळे ते सर्वजण प्रचारात सक्रीय होणार आहेत. कुणीही विरोधात काहीही करणार नाही. भाजपच्या उमेदवारांना सर्वजण चांगले सहकार्य़ करतील. उमेदवारीसाठी परवानग्या घेताना मात्र अधिकाऱ्यांनी सहकार्य केले नाही. त्यामुळे निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्यांना भरपूर वेळ गेला. आता प्रचाराच्या परवानग्यांसाठी वेळ द्यावा लागत आहे. प्रशासनाने ताबडतोब एक खिडकी योजना सुरू करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आल्याचे खासदार गांधी यांनी सांगितले.
 

 

संबंधित लेख