mp dhananjay mahadik in sharad pawar tour | Sarkarnama

महाडिकांची 'आयडिया' आज कामी आली, पण उद्या...

सदानंद पाटील 
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

उद्या मात्र ही संधी साधायची, असा चंगच महाडिक विरोधकांनी बांधला आहे. 

कोल्हापूर : कोल्हापूर दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासोबत दिवसभर थांबलेल्या खासदार धनंजय महाडिक यांच्यामुळे महाडिक विरोधकांची चांगलीच अडचण झाली.

खासदार महाडिकांविषयी पक्षाध्यक्ष पवार यांच्याकडे तक्रार करण्याची तयारी काही प्रमुख कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र दिवसभर महाडिक हे खासदार पवार यांच्यासोबतच राहिल्याने विरोधकांना ही संधी मिळाली नाही. मात्र काहीही करुन उद्या मात्र ही संधी साधायची, असा चंगच महाडिक विरोधकांनी बांधला आहे. 

खासदार धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीतून विरोध वाढत आहे. मुंबई येथे झालेल्या बैठकीत पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवार यांच्यासमोरच शहराध्यक्ष आर.के.पोवार व राजू लाटकर यांनी महाडिकांच्या पक्षविरोधी कारवायांवर तोफ डागली. महापालिका निवडणूक, जिल्हा परिषद निवडणुकीसह स्थानीय स्वराज्य संस्था निवडणुकीत महाडिक यांनी कशी पक्षविरोधी भूमिका घेतली, याची माहिती दिली होती. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांचाही महाडिकांना असलेला विरोध लपून राहिलेला नाही. त्यांनीही याबाबत उघड भूमिका घेतली आहे. त्यामुळे उमेदवारीचा तिढा कायम आहे. काहीही झाले तरी उमेदवारी मिळेल असा खासदार महाडिक यांना विश्‍वास असून आपणच 2019 ला खासदार असल्याचे ते सांगत आहेत. त्यामुळे महाडिक विरोधकांमध्ये अस्वस्थता आहे. 

महाडिक यांच्या पक्षविरोधी कारवाया आणि त्यांना असणारा विरोध याची माहिती खासदार पवार यांना देण्याची तयारी महाडिक विरोधकांनी केली होती. मात्र गुरुवारी दिवसभर महाडिक हे खासदार पवारांसोबतच होते. त्यामुळे विरोधकांना महाडिकांचा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली नाही. त्यातच आमदार मुश्रीफ हे देखील बाहेर असल्याने खासदार पवार यांच्यापर्यंत त्यांना पोहोचता आले नाही. उद्या मात्र आमदार मुश्रीफ हे कोल्हापुरात दाखल होणार असल्याने महाडिक विरोधक सुखावले आहेत. काहीही करुन उद्या महाडिकांविरोधात पक्षाध्यक्षांकडे तक्रारी करायच्याच, यासाठी महाडिक विरोधकांनी फिल्डींग लावली आहे.

संबंधित लेख