mp adhalrao removes from disha as a president | Sarkarnama

शिवसेना खासदार आढळरावांना भाजपचा झटका

मंगेश कोळपकर
सोमवार, 30 जुलै 2018

शिवसेना आणि भाजप या दोन सत्ताधारी पक्षांत आलबेल वातावरण नसताना भाजपने अचानक शिवसेनेला डिवचले आहे. शिवसेना खासदार आढळरावांना दिशा या समितीच्या अध्यक्षपदावरून हटवून तेथे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना नेमले आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि आढळराव यांच्यात या नव्या नियुक्तीमुळे पुन्हा नवा वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत. 

दिल्ली  : केंद्र सरकारच्या योजनांवर देखरेख करण्यासाठीच्या दिशा समितीचे अध्यक्षपदावरून शिवसेनेचे ज्येष्ठ खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची अचानक गच्छंती करून त्यावर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे. गेली 12 वर्षे आढळराव अध्यक्षपदावर होते.

शिवसेनेला डिवचण्यासाठी भाजपने ही कृती केली असून त्या मागे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचा हात आहे, असा आरोप आढळराव यांनी केला आहे. या घटनेमुळे शिवसेनेच्या खासदारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सेनेच्या खासदारांनी या बाबत केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र तोमरसिंग यांना सोमवारी पत्र लिहून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. 

केंद्र सरकारच्या सुमारे 23 योजनांवर देखरेख करण्यासाठी 2006 मध्ये ही समिती स्थापन करण्यात आली. समितीमध्ये पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडचा समावेश आहे. ग्रामीण भागासाठी ही समिती महत्वाची समजली जाते. तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांची अध्यक्षपदावर निवड झालेली असताना त्यांनी त्या वर काम करण्यास नकार दिला आणि आढळराव यांची शिफारस केली होती. 2007 पासून ते अध्यक्षपदावर होते. मात्र अचानक त्या वर जावडेकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्या बाबत आढळराव यांना थेट न कळविता जिल्हाधिकारी कार्यालयात पत्र पाठविण्यात आले. त्या मुळे सेनेचे खासदार संतापले आहेत

मनुष्यबळ विकास खात्याला जावडेकर पुरेसा वेळ देऊ शकत नसताना या समितीच्या बैठकांना ते कधी उपस्थित राहू शकतील, असा प्रश्न ही उपस्थित करण्यात येत आहे. शिरूर तसेच ग्रामीण भागातील शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे. खासदार सुप्रिया सुळे, अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे आणि आढळराव हे समितीचे अन्य सदस्य आहेत.

जावडेकर हे पुण्यातील असल्याने आणि मंत्री म्हणून त्यांची सिनिआॅरिटी असल्याने त्यांची नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. मात्र हे ज्येष्ठत्त्व आताच का आठवले, असा मुद्दा उपस्थित होत आहे. बापट व आढळराव यांच्यातील वादाला या पत्रामुळे मात्र आणखी फोडणी मिळाली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख