खासदार आढळराव व आमदार लांडगे पुन्हा आमनेसामने

राज्यात व त्यातही पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात बैलगाडा शर्यतीचे मोठे फॅड आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राजकारण या शर्यतीवर फिरणारे आहे. त्याचा आगामी लोकसभा आणि विधानसभेला फायदा होणार आहे. त्यामुळे खासदार शिवाजीराव आढळराव व आमदार महेश लांडगे हे या मुद्यावर क्रियाशील राहत एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न करीत आहेत.
खासदार आढळराव व आमदार लांडगे पुन्हा आमनेसामने

पिंपरी :  शिवसेनेचे शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आणि भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यातच आता "बैलगाडा शर्यत' सुरू झाली आहे.

बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचे सांगत त्यावर आता संसदेचा कायदा हाच एकमेव मार्ग राहिला असल्याचे आढळरावांनी नुकतेच सांगितले होते. त्यावर ही शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असलेले भोसरीचे पैलवान आणि भाजपचे सहयोगी आमदार लांडगे हे पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यांनी ही शर्यत सुरू करण्यासाठी उद्या (ता.23) भोसरीत बैलगाडामालक आणि शौकीन यांची बैठक बोलावली आहे.

ही शर्यत सुुरू होईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र,त्यावरून पिंपरी-चिंचवडमधील युतीच्या या खासदार आणि आमदारांत, मात्र श्रेयाची शर्यत आताच सुरू झाली आहे. 

राज्यात व त्यातही पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात बैलगाडा शर्यतीचे मोठे फॅड आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राजकारण या शर्यतीवर फिरणारे आहे. त्याचा आगामी लोकसभा आणि विधानसभेला फायदा होणार आहे.

आढळराव चौथ्यांदा 2019 ला खासदारकीसाठी तयारीत आहेत.तर, लांडगे त्यांना टक्कर देण्याच्या बेतात आहेत. लोकसभेचे तिकीट मिळाले नाही, तरी विधानसभा लांडगे पुन्हा नक्कीच लढणार आहेत. भोसरी या पिंपरी-चिंचवडच्या मुख्य उपनगरासह लगतच्या या मतदारसंघातील गावांतच बैलगाडा शर्यती होतात. त्यामुळे तेथील मतदारांना प्रभावित करण्यासाठी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी खासदार व आमदारांचे आपापल्या परीने प्रयत्न सुरू आहेत.

न्यायालयाने या शर्यतीवर बंदी घातली आहे. संसदेने ही शर्यत सुरू करण्याचा कायदा केला,तर न्यायालयाचा अडथळा येणार नसल्याने त्याबाबत संसदेच्या येत्या अधिवेशनात विधेयक आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आढळराव यांनी नुकतेच पिंपरीत सांगितले होते.

""दिशाभूल करणाऱ्यांपासून दूर रहा. बैलगाडा शर्यतींचे श्रेय घेण्यासाठी हौशे-नवशे-गवशे बरेच येतील, माकडउड्या मारतील अनं स्वतःला मिरवून जातील. पण आपल्यासोबत हा विषय शेवटपर्यंत मार्गी लावणारा मीच असेल. बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात म्हणून अगदी सुरवातीपासून आंदोलनं, कोर्ट कचेऱ्या, पोलिस स्टेशन, पूर्वीच राज्य व केंद्र सरकार यासर्वांशी आपल्यासोबत लढणारा मीच होतो व माझ्या गाडामालक, शेतकऱ्याला शेवटपर्यंत न्याय मिळवून देईपर्यंतही मीच असेल''असे म्हणत आढळराव यांनी नाव न घेता लांडगे यांना लक्ष्य केले होते.

त्यामुळे राज्य सरकारच्याच पातळीवर यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी आता आमदार लांडगे पुन्हा सरसावले आहेत. बैलगाडामालक व शौकिनांची मते जाणून घेतल्यानंतर याबाबत थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com