Mother in law defeats daughter in law In sarpach election | Sarkarnama

सासूबाई जोरात ! सरपंचपदाच्या निवडणुकीत सुनबाईंना केले पराभूत !

संपत देवगिरे 
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

यामध्ये मुलगा व वडील दोघांपुढेही कोणाचा प्रचार करावा? हा प्रश्‍नच होता. त्यामुळे ते फारसे सक्रीय नव्हते. 

नाशिक :  सासु- सुनेचे भांडण घरोघरी असते . एकाच राजकीय पक्षातील नेत्यांची गटबाजीही सर्वत्र दिसते . पण राजकारणात सासू सुनेचे भांडण क्वचितच दिसते .  ही लढाई  मोडाळे (ता. इगतपुरी) येथे झाली .  सरपंचपदाच्या निवडणुकीत   सासुबाईंनी  सूनबाईना पराभूत करून घरात आणि गावात सासुचाच आवाज चालणार हे दाखवून दिले . 

त्याचे झाले असे की सुनबाई   कल्पना बोंबले   या राजकारणात होत्या . त्यांनी सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी भाजपला रामराम करुन राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र   राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी सासूबाईंना  मिळाली. त्यावर शांत न बसता सुनेने सासुविरुध्दच अपक्ष निवडणुक लढवली. पंचक्रोशीतील गावांचे लक्ष लागलेल्या या प्रतिष्ठेच्या लढतीत अखेर  राष्ट्रवादीच्या उमेदवार  असलेल्या सासूबाई  मंगला राधाकिसन बोंबले यांनी सुनेचा पराभव केला.

 यात एक- एक मत मिळवणे नेत्यांनी प्रतिष्ठेचे केले होते. त्यामुळे या निवडणुकीची चांगलीच चर्चा झाली.  तालुक्‍याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत आदिवासींसाठी राखीव सरपंच पदासाठी एकाच कुटुंबतील सासू मंगला बोंबले आणि सुन कल्पना बोंबले यांच्यात लढत झाली. त्यात दोघींनीही चुरशीने निवडणुक लढवली. यामध्ये मुलगा व वडील दोघांपुढेही कोणाचा प्रचार करावा? हा प्रश्‍नच होता. त्यामुळे ते फारसे सक्रीय नव्हते. 

मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्यासाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची होती. त्यांनी एक- एक मतासाठी जीवाचे रान  केले. बोडके यांचे गावातील  विरोधक सुनेला बळ देत होते. या लढतीत थेट सरपंचपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंगला बोंबले विजयी झाल्या. अन्य नऊ सदस्यांत सीताबाई बाबुराव शेंडगे, अंजना कृष्णा बोडके, आशा संजय धात्रक, लंकाबाई केरु ढोनर, ज्ञानेश्वर त्र्यंबक झोले, विमलबाई कचरू शिंदे, बिजलाबाई बबन गोऱ्हे, संतोष देवाचंद बोडके, विठल आनंदा जगताप विजयी झाले. 

संबंधित लेख