'पप्पा' बरोबर आम्ही अनेकदा एकत्र व्यायाम करतो

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचा आज वाढदिवस आहे . त्यानिमित्त त्यांचे चिरंजीव राजवर्धन यांनी त्यांच्याविषयी लिहिलेय . महाराष्ट्रात मुत्सद्दी , धुरंधर आणि यशस्वी राजकारणी म्हणून प्रसिद्धअसलेले जयंत पाटील कुटुंबियांशी कसे वागतात ? आपल्या मुलांशी कसे मैत्रीपूर्ण संबंध ठेवून आहेत ? ते मुलांवर काय संस्कार करतात? याचा उलगडा या लेखातून होतो .
jayant Patil & sons
jayant Patil & sons

मंत्री, राजकारणी आणि आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून पप्पा सर्वांना परिचित असले तरी ते एक कुटुंबवत्सल म्हणून आम्हाला अधिक प्रिय आहेत. सर्व प्रकारचे व्याप सांभाळून ते आम्हाला वेळ देतात. पप्पांना आज राजकारणात जो आदर मिळतोय तेच मिळविण्याचे आमच्या दोघांचेही लक्ष्य आहे; तरच आम्ही आयुष्यात काहीतरी मिळविल्याचे समाधान असेल.

आमच्या लहानपणापासून पप्पा मंत्री असोत, नसोत किंवा सत्ता असो-नसो; त्यामुळे घरातील त्यांच्या वागण्यात कोणताही फरक नाही. आमचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांनी घरात कधीच 'राजकारण' आणले नाही. शिक्षणाशिवाय प्रगती नाही या विचाराचे ते आहेत. मी इंग्लंडमध्ये असतानाही ते रोज चौकशी करत.

आजही अगदी जेवण, अभ्यास, प्रवास अन्य अडचणींवर ते लक्ष ठेवून असतात. मी पदवीधर झालो तेव्हा त्या कार्यक्रमात ते येऊ शकले नव्हते. पदव्युत्तरला प्रवेश घेतला तेव्हाही त्यांना वेळ नव्हता; पण त्या पदवीदान समारंभाला मात्र ते आवर्जून उपस्थित राहिले आणि नंतर परत जाऊन अधिवेशनात सहभागी झाले होते.

कितीही व्यापात असले तरी कुटुंबियांची ते सतत चौकशी करतात. मला फुटबॉल खेळाची आवड आहे. आधी त्यांनी मॅचला यावे, असा मी आग्रह करत असे; पण नंतर मी सांगणे बंद केले. त्यांच्या ओळखीमुळे माझ्या खेळावर परिणाम होईल, असे मला वाटत होते.

पण एकदा माझ्या टीमच्या फायनल मॅचला कुणालाही काहीही कळू न देता स्टेडियमच्या एका कोपऱ्यात भर पावसात उभे राहून त्यांनी मॅच पाहिली होती. गृहमंत्री असूनही सुरक्षा व्यवस्था आणि यंत्रणा टाळून ते आले होते. काहीही असो त्यांचे कुटुंबाला प्राधान्य असते.

गेली अनेक वर्षे आणि आजही घरी असा अलिखित नियम आहे की, रात्री सर्वानी एकत्र जेवायचेच. आजी आजारी होती तेव्हा पप्पा, मी किंवा प्रतीकदादा यापैकी एकाने तिच्यासोबत राहायचेच, यासाठी ते आग्रही होते.

आम्ही तिघे सतत वेगवेगळ्या ठिकाणी असतो, पण तिघांना कसे, कुठे एकत्र आणायचे हे सगळे नियोजन पप्पांचे असते. मंत्री असताना आणि त्याहीआधी शिवाय आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असतानाही त्यांच्या वागण्यात तसूभरही फरक नाही.

आम्ही एकत्र सिनेमा एन्जॉय करतो. त्यांना ऍक्शन सिनेमे आवडतात. नुकताच URI सिनेमा पाहिला. त्यांना दिवसभर अनेक कार्यक्रमात सहभागी व्हायचे होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे निघायचे होते. तरीही आम्ही मुंबईत रात्री साडेअकराचा शो पाहिला. सकाळी मी अंथरुणातून उठायच्या आधी हे बाहेर पडले होते.

घरी अनेकदा रात्री उशिरापर्यंत आम्ही गप्पा मारतो. बातम्या, फुटबॉलच्या मॅचेस किंवा आवडीचे सिनेमे पाहातो. रात्री तीन वाजता मॅच पाहणे संपवून पहाटे साडेसहाला ते बाहेर पडल्याचे पाहिलंय. पूर्ण चोवीस तासांचा सदुपयोग कसा करायचा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे, तेही आरोग्य सांभाळून.

घरी किंवा कुठेही एखादा माणूस त्यांना भेटायला आलाय आणि न भेटता किंवा असमाधानी भावनेने परत गेलाय, असे मी कधीच पाहिलेले नाही. ते सर्वांना वेळ देतात. आपुलकीने बोलतात. कामे करतात. डोक्यात कोणताही भेदभाव नसतो. राजकारण नसते.

आजी सिरीयस होती, उपचार सुरू होते तेव्हा पप्पा 'हल्लाबोल' दौऱ्यात बिझी होते. त्यातूनही रात्री येऊन सकाळी दवाखान्यात आजीजवळ थांबून विमानाने जायचे आणि पुन्हा रात्री यायचे. प्रवासात त्यांचा प्रचंड वेळ गेलाय म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मतदारसंघालाही ते वेळ देतात. एका कार्यकर्त्याच्या आग्रहानुसार ते लहान मुलीच्या वाढदिवसालाही गेले होते. त्यांचा बहुतांश वेळ लोक आणि समाजकार्यात जातो.

त्यांच्यावर अनेकदा टीका होते, आरोप होतात; पण घरी येतात तेव्हा त्याचा लवलेशही त्यांच्या वागण्यात नसतो. अनेक घडामोडी घडतात पण त्यांनी त्याचा कुठलाही त्रास आमच्यापर्यंत येऊ दिला नाही. किरकोळ पदे मिळाल्याने अनेकजण हवेत जातात, हे आपण पाहतो पण पप्पांना पदाचा कधीच गर्व नाही. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आपले काम साधेपणाने करत राहणे आणि कुटुंबाला प्राधान्य देणे ही त्यांची जीवनशैली आहे.

आम्ही अनेकदा एकत्र व्यायाम करतो. अशावेळी गप्पा आरोग्यविषयीच असतात. ते त्याबाबतीत खूप सतर्क आहेत.कुठल्याही आरोपामुळे ते त्रासिक झालेत आणि चिडलेत असे होत नाही. राजकारणात यशस्वी होण्यासाठी संयम आवश्यक असल्याचे ते नेहमी सांगतात.

दुसरा काहीही बोलला तरी आपण खालची पातळी कधीच न गाठण्याची त्यांची आम्हाला शिकवण आहे. कोणतीही गोष्ट बारकाईने समजून घेऊन, अभ्यास करूनच बोलण्याची त्यांची पद्धत आहे. त्यामुळेच अमेरिकेच्या 'हॉर्वर्ड'सारख्या जागतिक विद्यापीठातून त्यांना वक्ता म्हणून निमंत्रण मिळते. ते तितके अभ्यासू आहेत.

डोक्यात कधीही जातपात नसते. भेद नसतो. इस्लामपूर असो किंवा मुंबई तसेच मोठा उद्योजक, राजकारणी असो किंवा सामान्य माणूस ते सर्वांशी समान वागतात. घरी ते खूप निवांत असतात.

एखाद्या सामान्य कुटुंबात जसे वातावरण असते तसेच आमच्यातही आहे. मला डेंग्यू झालेला तेव्हा त्यांनी स्वतः पूर्णवेळ माझी काळजी घेतली होती. ते आमच्या कुटुंबाचे आधारस्तंभ आहेत. सर्वांच्याच आरोग्यासाठी ते दक्ष असतात. विकास आणि प्रगतीचा सर्वांगीण विचार ही त्यांची शिकवण आमच्यासाठी प्राधान्यक्रमाचा भाग आहे.

मी आणि प्रतिकदादा आज सर्वत्र फिरतोय तर पप्पा दरवेळी आवर्जून चौकशी करतात. बाकी आम्हाला कोणताही राजकीय आग्रह नसतो. लोकांशी कसे बोलायचे सांगतात. आपण कसे बोलतो यापेक्षा लोक आपल्या कामावरूनच आपणाला ओळखतात, ही त्यांची शिकवण आहे.

नोकरी मेळाव्याला ते औरंगाबादहुन रात्रभर प्रवास करून इस्लामपुरात आले. इस्लमपूरचा कार्यक्रम करून मुंबईला गेले .  मुंबईतील कार्यक्रमांना हजेरी लावली आणि पुन्हा परत सकाळी इस्लामपुरात आले होते. त्यांच्याकडून घेण्यासारखे खूप काही आहे. त्यातले निम्मे जरी शक्य झाले तरी खूप मिळविले असेच म्हणावे लागेल.

गेल्या ३५ वर्षात निम्मे आयुष्य त्यांचे गाडीतून प्रवासातच गेलेय. इतके करूनही ते स्वतःचा उदो कधीच करत नाहीत. आम्हालाही तशा सूचना आहेत. सर्व नेत्यांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. विधानसभेतील भाषणात ते कधीच कुणावर वैयक्तिक टीका न करता मुद्देसूद मांडणी करतात. देशातील रतन टाटापासून अनेक उद्योजक त्यांचा आदर करतात. ते कष्टाळू राजकारणी आहेत. टेक्नोसॅव्ही आहेत. आधुनिक शेती आणि तंत्रकौशल्यासाठी ते आग्रही असतात.

(शब्दांकन : धर्मवीर पाटील, इस्लामपूर)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com