That moment of re entering cabinet will never come : Eknath Khadse | Sarkarnama

मंत्रीमंडळात परतण्याची योग्यवेळ कधीच येणार नाही:खडसे 

कैलास शिंदे
शुक्रवार, 27 जुलै 2018

पक्षांने माझ्यावर कितीही अन्याय केला तरी आपण पक्षाचे कार्यकर्ते म्हणूनच काम करणार आहेत. आपण कधीही पक्ष सोडणार नाही. 

जळगाव  : आपली मंत्रीमंडळात परतण्याची वेळ कधीच येणार नाही असे धक्कादायक विधान माजी महसूलमंत्री व भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत केले. 

जळगाव महापालिका निवडणूकीच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आज जळगावात आले होते. सायंकाळी हॉटेल प्रेसिंडेंट कॉटेज येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जलसपंदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे उपस्थित होते.

 एकनाथराव खडसे यांचा मंत्री मंडळात पुन्हा कधी प्रवेश होणार?असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला त्याला उत्तर देतांना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले," खडसे आमचे नेते आहेत, योग्य वेळ येईल त्यावेळी त्यांचा मंत्री मंडळात सामावेश करण्यात येईल. "

त्यानंतर ती योग्य वेळ कधी येणार?असा उपप्रश्‍न पत्रकारांनी विचारला असता, दानवे यांनी उत्तर देण्या अगोदरच खडसे म्हणाले, "ती योग्य वेळ कधीच येणार नाही."

त्यानंतर दानवे यांनी पत्रकार परिषद आटोपली. मात्र त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना खडसे म्हणाले, " मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, पक्षांने माझ्यावर कितीही अन्याय केला तरी आपण पक्षाचे कार्यकर्ते म्हणूनच काम करणार आहेत. आपण कधीही पक्ष सोडणार नाही, तसा विचारही आपल्या मनात येत नाही."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख