वाशिमची "लेडी सिंघम' ठरतेय गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ

वाशिमची "लेडी सिंघम' ठरतेय गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ

वाशिम : फोफावत चाललेले अवैध धंदे अन्‌ त्याला मिळणारा राजाश्रय जिल्ह्यात चिंतेची बाब होती. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसला. मात्र चार महिन्यापूर्वी जिल्हा पोलिस अधिक्षकपदाचा कार्यभार स्विकारणाऱ्या मोक्षदा पाटील या "लेडी सिंघम'ने गुन्हेगारांवर अंकुश निर्माण करून आपला दरारा कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. 

"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्‍य. कायदा व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनावर आहे. वाशिमकरांमध्ये विश्वास निर्माण करेल असे लोकाभिमुख पोलिस प्रशासन कोसो दूर असल्याचे चित्र होते. तत्कालीन पोलिस अधिक्षक सुधीर हिरेमठ यांच्या कार्यकाळाचा अपवाद वगळता जिल्ह्यात कायमच गुन्हेगारांची दहशतच पहायला मिळाली. 

मात्र, ही परिस्थिती बदलायला हळू-हळू सुरवात झाली आहे. महाराष्ट्र पोलिस दलात "लेडी सिंघम' म्हणून नावारुपाला येत असलेल्या मोक्षदा पाटील यांनी वाशीम जिल्हा पोलिस अधिक्षक पदाची सुत्रे स्विकारल्यापासून गुन्हेगारांची पळताभुई होत आहे. युपीएससीव्दारे मोक्षदा पाटील यांची निवड झाली. यापुर्वी त्यांनी नागपूर, नाशिक येथे परिविक्षाधीन म्हणून काम पाहिले. त्यानंतर जळगाव येथे अपर पोलिस अधिक्षकपदावर उत्कृष्ट कामगिरी केली. नागपूर ग्रामीणला परिविक्षाधिन अधिकारी असताना एका गावाचे पुनर्वसन करण्यासाठी सर्व ग्रामस्थांना गावाबाहेर न्यावयाचे होते. त्यावेळेस गावातील काही लोकांनी गाव न सोडण्याचा निर्धार करीत अधिकाऱ्यांना गावाबाहेर काढण्यासाठी मिरची पावडर व दगडाचा मारा करण्याची तयारी केली होती. 

अशा कठीण परिस्थितीत गावातील प्रतिष्ठीत लोकांशी संपर्क करून ही परिस्थिती त्यांनी अत्यंत योग्य पद्धतीने हाताळली. अशा अनेक प्रसंगांना सामोरे जातांना त्यांनी समाजमन जपण्याचाही पुरेपुर प्रयत्न केला. गेल्या चार महिन्यांपुर्वी वाशीम जिल्ह्याचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी आपल्या जिल्ह्यातील गुन्हेगारी जगताचा आढावा घेत त्याला पायबंद घालण्यासाठी पुढाकार घेतला. 

माफियाराज संपवले 
मोक्षदा पाटील रूजू होण्यापूर्वी जिल्ह्यामध्ये अवैध धंद्याना उधाण आले होते. काही अधिकारी तर अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घआलत असल्याची चर्चा होती. ठाणेदारांनी गुटखा माफियावर कारवाई केली म्हणून त्यांना शाबासकी देण्याऐवजी त्या ठाणेदारांची रवानगी मुख्यालयात केली गेल्याच्या घटना दोनवेळा घडल्या होत्या. अशा पार्श्वभूमीवर मोक्षदा पाटील एसपी तर स्वप्ना गोरे ऍडिशनल एसपी म्हणून आल्यावर या दोन रणरागीणींनी अवघ्या अडीच महीन्यात जिल्ह्यातील अवैध धंदे हद्दपार केले आहेत. राजकीय वरदहस्ताची शेखी मिरविणारे माफिया भूमिगत झाले आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com