mohite patil strategy for madha loksabah | Sarkarnama

राष्ट्रवादीने मोहिते पाटलांची उमेदवारी कापली तर ते भाजपकडून लढणार?

भारत नागणे
बुधवार, 9 जानेवारी 2019

मोहिते पाटलांनी सावधपणे पावले टाकत मतदारसंघाची बांधणी केली आहे.

पंढरपूर : माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा सस्पेन्स यंदाही कायम आहे. निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी माढा मतदारसंघात दौरे वाढवल्यामुळे विजयसिंह मोहिते पाटलांचे समर्थक कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. ते प्रसंगी 'भाजप'ची भाषा बोलू लागले आहेत.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून विजयसिंह मोहिते पाटील शरद पवारांसोबत आहेत. पक्षाने त्यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन   सन्मानही केला, मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पराभवानंतर काही दिवस बॅकफूटवर गेलेल्या मोहित्यांना राष्ट्रवादीने माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सदाभाऊ खोत यांनी चांगलीच टक्कर दिली. या लढतीमध्ये मोहितेंचा निसटता विजय झाला. 

2009 मधील विधानसभेचा पराभव व 2014 लोककभेतील निसटता विजय या दोन्ही घडामोडीतून मोहिते गट भरपूर काही शिकला आहे. सावधपणे पावले टाकत मतदारसंघाची बांधणी केली आहे. अशातच प्रभाकर देशमुख तीन महिन्यांपासून सातत्याने माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस या भागाचे दौरे करत आहेत. दोन दिवसांपासून त्यांनी दु्ष्काळी दौऱ्याच्या नावाखाली गावात बैठका सुरु केल्या आहेत. पाणी, वीज, रस्ते हे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या विचारांच्या उमेदवारांना लोकसभेत पाठवावे, असे ते आवाहन देखील करत आहेत. एकूणच देशमुखांनी सुरु केलेल्या मोर्चे बांधणीमुळे विजयसिंह मोहिते पाटलांचे कार्यकर्ते व समर्थक कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. ऐनवेळी राष्ट्रवादीने मोहिते पाटलांची उमेदवारी कापली तर ते भाजपाकडून निवडणूक लढवू शकतात, अशी ही समर्थक कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु आहे. 

संबंधित लेख