...राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा मोहन प्रकाश यांच्या उचलबांगडीचीच

 ...राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा मोहन प्रकाश यांच्या उचलबांगडीचीच

पुणे : कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांच्याकडून प्रभारीपदाची जबाबदारी काढून घेत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे देण्यात आली आहे. गेली नऊ वर्षे महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळलेल्या मोहन प्रकाश यांच्याकडून अचानकपणे ही जबाबदारी काढून घेण्यात आल्याने त्याचीच चर्चा राज्याच्या राजकारणात जोरदार सुरू आहे. 
प्रकाश यांच्याकडून जबाबदारी काढून पक्षाचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आल्याने महाराष्ट्राकडे कॉंग्रेस खूप गांभीर्याने पाहात असल्याचा स्पष्ट झाले आहे. 

मात्र मोहन प्रकाश यांची उचलबांगडी नेमकी कोणत्या कारणामुळे झाली या बाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. राज्यातील काही नेत्यांच्या त्यांच्याबाबत तक्रारी होत्या असे सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात कोल्हापूर येथे माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ कॉंग्रसे नेते पी. चिदंबरम एका कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळीदेखील काही नेत्यांनी मोहन प्रकाश यांच्याविरोधात तक्रारी केल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात कॉंग्रेसची सत्ता होती त्या काळात मोहन प्रकाश यांच्याकडे तब्बल पाच वर्षे राज्याचे प्रभारीपद होते. 

मुख्यत: अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मोहन प्रकाश यांच्याकडे पक्षाची जबाबदारी होती. याच काळात लोकसभा व विधानसेच्या दोन निवडणुका झाल्या. 2009 च्या विधानसभेला कॉंग्रेस व राष्ट्रवादीची एकत्रित सत्ता आली मात्र 2014 च्या निवडणुकीत राज्यातील आणि केंद्रातील सत्ता गेली. या काळात मोहन प्रकाश यांच्याकडेच पक्षाची जबाबदारी होती. कॉंग्रेसची संघटनात्मक बांधणी याच काळात खालावली आणि पक्ष सत्तेपासून गेला. 

मूळचे समाजवादी कॉंग्रेसचे असलेले मोहन प्रकाश विद्यार्थी दशेपासूनच चळवळीची संबंधित आहेत. राजस्थानमधून राष्ट्रीय राजकाणात असलेल्या प्रकाश यांचे संघटन कौशल्य वादातीत आहे. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्याविरोधात जयप्रकाश नारायण यांनी आंदोलन उभारले. या आंदोलनाच्या काळात मोहन प्रकाश यांनी बनारस हिंदू विश्‍व विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. विद्यार्थी दशेपासूनच आक्रमक असलेल्या प्रकाश यांना पक्षात चांगले स्थान मिळत गेले. यातूनच महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्याचे नेतृत्व त्यांच्याकडे आले होते. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com