mohan bhagwat speech in dehli | Sarkarnama

नागपूरहून दिल्लीला फोन जात नाही!

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

हिंदुत्व हा संघाचा विचार असल्याचे सांगितले जात असले, तरी तो संघाचा नव्हे तर भारतीय संस्कृतीचा विचार आहे व तो भाषा, प्रांत, प्रदेश, जातीपाती यांत जखडलेला विचार नाही, असे सांगून भागवत म्हणाले, की "हिंदुत्व' शब्द संघाला चिकटला असला तरी भारत, आर्य, इंडिग, भारतीय या शब्दांना संघाचा विरोध नाही. राज्यघटना ही सर्वोच्च आहे व त्यानुसारच देश चालला पाहिजे, यावर संघाचे पहिल्या दिवसापासून ठाम मत आहे. 

नवी दिल्ली : संघाला भारताची राज्यघटना संपूर्ण मान्य असून, घटनेविरुद्ध संघाने काम केल्याचे एकही उदाहरण सापडणार नाही, असे सांगत, सरसंघचालक मोहन भागवत यांनी, संघ देशाच्या सरकारच्या कामात हस्तक्षेप करत नाही व नागपूरहून आलेल्या फोननुसार दिल्लीचे सरकार चालत नाही. सत्तेत असलेले लोक ते चालविण्यासाठी समर्थ आहेत, असे स्पष्ट केले. मात्र सरसंघचालकांनी पक्षातीत असलेल्या सर्वोच्च पदावरील भारताच्या राष्ट्रपतींनाही स्वयंसेवकाचे लेबल चिटकवल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

"भारत का भविष्य' या मालिकेच्या दुसऱ्या व्याख्यानात बोलताना भागवत म्हणाले, की मुसलमान नकोत, असे संघ कधीही म्हणत नाही. हिंदू राष्ट्र म्हणजे त्यात मुसलमान नकोतच, ही संघाची धारणा बिलकूल नाही. भारताचे व्हिजन डॉक्‍युमेंट समतायुक्त, शोषणमुक्त व अखिल विश्‍वाबद्दलची सद्भावना व बंधुभाव असलेले असे बनले पाहिजे, हा संघाचा आग्रह आहे. देशभक्ती, पूर्वजांचा गौरव, वैश्‍विक व मूल्याधारित धर्म हवा. तो भारतीय संस्कृतीतच आढळतो व "रिलीजन' हे त्याचे योग्य भाषांतर नव्हे. नागपूरहून फोन जातो, असे जे अंदाज लावले जातात, ते साफ चुकीचे आहेत. केंद्रात कार्यरत असलेले अनेक लोक स्वयंसेवक आहेत. पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्री इत्यादी अनेक जण स्वयंसेवक राहिले असल्याने अशा गोष्टी बोलल्या जातात. प्रत्यक्षात हे सारे लोक माझ्याच वयाचे असले तरी राजकारणात ते मलाही सीनियर आहेत. मला संघकार्याचा जेवढा अनुभव आहे त्यापेक्षा त्यांचा राजकारणात जास्त अनुभव आहे. त्यांना अशा सल्ल्याची गरजच नाही, ते समर्थ आहेत. मात्र त्यांनी सल्ला मागितला तर तो आम्ही जरूर देतो. राजकारण व सरकारच्या धोरणांवर संघाचा काहीही प्रभाव नाही. संघाचा राजकारणाशी संबंध काय, एकाच पक्षात सर्वाधिक स्वयंसेवक का आहेत, इतर पक्षांत जाण्याची इच्छा स्वयंसेवकांना का होत नाही, या प्रश्‍नांवर भागवत म्हणाले, की या प्रश्‍नांची उत्तरे संबंधितांनीच शोधायची आहेत. आम्ही कोणत्याही स्वयंसेवकाला विशिष्ट राजकीय पक्षातच काम करण्यास सांगत नाही. मात्र राष्ट्रनिर्माण व राष्ट्रवैभवासाठी एका विचाराने, एका धोरणाने व एक भव्य स्वप्न घेऊन काम करणाऱ्यांच्या मागे उभे राहा, असे संघ आपल्या स्वयंसेवकांना जरूर सांगतो. संघात जबाबदारीच्या पदांवरील कोणीही राजकारणात अजिबात पडत नाही. 

 

संबंधित लेख