इतकी राजकीय अस्पृश्‍यता कशासाठी ? 

सरसंघचालक मोहन भागवत जर येणार असतील तर तेथे मी जाणार नाही अशी भूमिका रायगडावर कार्यक्रम होण्यापूर्वी आदित्य तटकरे यांनी का घेतली नाही. या कार्यक्रमाला गेल्याने कधीही न भरून येणारे राजकीय नुकसान होणार होते का ?
इतकी राजकीय अस्पृश्‍यता कशासाठी ? 

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत. शिवरायांना जाऊन 338 वर्षे पूर्ण झाली. या वर्षात महाराजांची आठवण झाली नाही असा एकही दिवस पुढे सरकत नाही. शिवरायांची कीर्ती आणि रूप नेहमीच मराठी मनाला आठवत जाते. आजपर्यंत अनेक राजेमहाराजे होऊन गेले पण, मराठी माणसाच्या हद्‌यावर खऱ्या अर्थाने राज्य केले ते शिवरायांनीच. महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांना निमंत्रित करण्यात आलेल्या पत्रिकेवरून राजकारण पेटले. 

रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती  यांचे नाव पत्रिकेवर असल्याने वादाला फोडणी मिळणे स्वाभाविक होते. वास्तविक रायगडावरील कार्यक्रमाशी तटकरे कुटुंबीयांचा काही संबंध नसल्याचा खुलासा खुद्द सुनील तटकरे यांनी केला.

समजा खुलासा केला नसता तरीही तरी काही आभाळ कोसळणार नव्हते. सरसंघचालक हे संघाचे प्रमुख असले तरी ते सार्वजनिक जीवनात कार्यरत असतात. संघाच्याच नव्हे तर इतर संघटना आणि संस्थाही त्यांना नेहमीच निमंत्रण देत असतात. तशी निमंत्रणे ते स्वीकारतही असतात. संघाला इतके अस्पृश्‍य मानण्याचे कारण काय ? 

रायगडावर आयोजित केलेला कार्यक्रम हा कोणाचा वैयक्तिक कार्यक्रमही नव्हता. शिवाजीमहाराज हे संपूर्ण समाजाचे आहेत. त्यामुळे तेथे प्रत्येक मराठी माणूस पिढ्यान्‌पिढ्या जात आला आणि जात राहील. यापूर्वी तेथे इंदिरा गांधी, लालकृष्ण अडवानी, शरद पवार, नितीन गडकरी आदी मान्यवरांनीही उपस्थिती लावली आहे. यावेळी डॉ. भागवत यांना निमंत्रित करण्यात आले होते.

या कार्यक्रमांना कोणाला बोलवायचे आणि कोणाला नाही याचा निर्णय श्री शिवाजी स्मारक मंडळ (रायगड) व स्थानिक उत्सव समिती घेत असते आणि कार्यक्रमही ते आयोजित करतात. 

यावेळी या समितीने डॉ. भागवताना निमंत्रित केले होते. शिवाय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे कोणीही होवोत ते रायगड पूजा विधीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे कोणाला जरी निमंत्रित केले तरी निमंत्रित पत्रिकेवर आदिती यांचे नाव येणे स्वाभाविक होते. जर निमंत्रण होते आणि रायगड जिल्हा परिषदेच्या त्या अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाला जायलाच हवे होते.

मुळात कार्यक्रम ठरविताना आणि निमंत्रण पत्रिकेवर नाव प्रसिद्ध होणार आहे याची कल्पना तटकरे यांना दिलीच असेल. भागवत जर येणार असतील तर तेथे मी जाणार नाही हे कार्यक्रम होण्यापूर्वी का नाही लक्षात घेतले हा प्रश्‍न आहेच. 

नेमके कार्यक्रमादिवशी टीकाटीपण्णी होताच तटकरे कुटुंबीयांपैकी कोणीही तिकडे फिरकलेच नाही. राजकारणात इतकी अस्पृश्‍यता आणण्याचे काही कारण नसताना शिवरायांच्या कार्यक्रमाला जो राजकीय रंग देण्यात आला तो मुळीच समर्थनीय नव्हता असे म्हणावे लागेल. एका कार्यक्रमावरून तटकरे कुटुंबीयांचा संघाशी संबंध जोडणेही चुकीचे आहे. 

दुसरी एक गोष्ट अशी की समजा डॉ. भागवत आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये जरी मैत्री आहे किंवा दोघांनाही एकमेकाबद्दल आदर असला तरी बिघडले कुठे ? यानिमित्ताने येथे एका मैत्रीचा जाणीवपूर्वक उल्लेख करावा लागेल. संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य आणि कॉंग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मंत्री डॉ. श्रीकांत जिचकार यांचे. हे दोघेही अगदी टोकाचे मतभेद असलेल्या संघटनेत होते. तरीही या दोघांची मैत्री जगजाहीर होती. डॉ. जिचकार हे व्यासंगी आणि अनेक महत्त्वाच्या पदव्या घेतलेले उच्चविभूषित व्यक्तिमत्त्व होते.

या दोघांनी आयुष्यभर मैत्री जपली. पण, डॉ. जिचकार हे कधीही संघाच्या वाटेला गेले नाहीत. त्यांनी कॉंग्रेसशी असलेली आपली नाळ कधीही तोडली नाही. जेव्हा ते रणांगणात असत तेव्हा ते संघ-भाजपवर कडाडून हल्ला चढवीत. अगदी टोकाचे मतभेद असूनही मैत्री जपण्याचे काम या दोघांनी केले. मा.गो.वैद्यांनी डॉ. जिचकरांविषयी नेहमीच आदर व्यक्त केला. सार्वजनिक जीवनातील अशी मैत्रीची अनेक उदाहरणे देता येतील. 

येथे तटकरेंची मुलगी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे थेट तटकरेंनी डॉ. भागवतांसाठी पायघड्या घातल्या असे म्हणणे योग्य होणार नाही. याबाबत जो काही खुलासा करायचा आहे तो सुनील तटकरे यांनी करून समज गैरसमज होणार नाहीत याची दक्षता घेतली ते बरेच झाले. पण, त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ का फिरविली याचे उत्तरही त्यांनी दिले पाहिजे. 

संघ काय किंवा इतर पक्ष काय ? सार्वजनिक कार्यक्रमात भिन्न मंडळी एका व्यासपीठावर आल्याने काही बिघडत नाही. उलट वैचारिक देवाणघेवाण होऊन कटुता कमी होण्यामध्ये भर पडत असते. सरसंघचालकांना पूजनीय म्हटल्यानेही वाद झाला. त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली.

टीका होताच संपूण तटकरे कुटुंबीयांनी रायगडावरील कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. छत्रपती शिवाजीमहाराज आणि रायगडाविषयी मराठी माणसाला सार्थ अभिमान आहे. कोणतीही विचारसरणी असो शिवाजीमहाराजांच्या कार्यक्रमात कोणी राजकारण आणणार नाही याची खबरदारी सर्वांनीच घ्यायला हवी असे वाटते. ठरलेल्या कार्यक्रमाला जाणे रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे कर्तव्यच होते असे वाटते. सरसंघचालकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला गेल्याने कधीही न भरून येणारे राजकीय नुकसान होणार होते का ? का प्रश्‍न आहेच. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com