Modi's repeated attacks on me show that we are in good position : Sharad Pawar | Sarkarnama

मोदी वारंवार माझ्यावर हल्ले करीत आहेत याचाच अर्थ आघाडीची परिस्थिती राज्यात बरी : पवार 

निवास चौगले-सरकारनामा वृत्तसेवा 
शनिवार, 13 एप्रिल 2019

आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या मात्र देशाच्या पंतप्रधानांनी इतका वेळ एका राज्यात कधी घालवला नाही. पंतप्रधान मोदी मात्र सातत्याने राज्यात येत आहेत.

-शरद पवार

कोल्हापूर : राज्यातील निवडणुकीचे वातावरण हे कॉंग्रेस,-राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाखालील महाआघाडीला अनुकुल आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दर दोन-तीन दिवसांनी महाराष्ट्रात येत आहेत. याचाच अर्थ आघाडीची परिस्थिती बरी आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ श्री. पवार गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात आहेत. आज ते रत्नागिरीला रवाना झाले, तत्पुर्वी त्यांनी  पत्रकारांशी संवाद साधला. 

"आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या मात्र देशाच्या पंतप्रधानांनी इतका वेळ एका राज्यात कधी घालवला नाही. पंतप्रधान मोदी मात्र सातत्याने राज्यात येत आहेत. येथे आल्यानंतर प्रत्येक सभेत त्यांनी माझ्यावर प्रेम व्यक्त केले. ते माझ्यावर व्यक्‍तीगत हल्ले करत आहेत. कुटुंबावर हल्ले करत आहेत. प्रत्येक सभेत शरद पवार हा त्यांचा "कॉमन" विषय त्यांच्यासमोर दिसतो. याचा अर्थ आमचं बर चाललय असे होतो. त्यांनी केलेल्या वक्‍तव्याचा 'फिडबॅक' कोणीतरी त्यांना दिल्यानंतर त्यांनी आपला "टोन' सुधारला आहे. आता ते जरा बरं बोलत आहेत", असा टोलाही पवार यांनी लावला. 

" काश्‍मीरच्या प्रश्‍नावर मी कॉंग्रेससारख्या फुटीरतावादी पक्षासोबत जातो असे ते म्हणतात , त्यावर मी का बोलत नाही अशी विचारणा मोदी करतात. खरं तर मी या विषयावर कधी भाष्य केलेले नाही. पण त्यांचा रोख मात्र माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याकडे आहे. आमची मुफ्ती यांच्यासोबत काही आघाडी नव्हती, उलट त्यांच्या सरकारमध्ये भाजपचे मंत्री होती. त्यामुळे त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांचे उत्तर त्यांनीच देणे आवश्‍यक आहे. मात्र ते दिशाभूल करून त्याचे उत्तर माझ्याकडे मागतात," असेही श्री. पवार म्हणाले. 

ते म्हणाले,"काश्‍मिरमध्ये आता वेगळे चित्र दिसत आहे, त्याचे कारण पंतप्रधान झाल्यानंतर श्री. मोदी यांनी या राज्यातील जनतेसमोर विकासाचा कार्यक्रम मांडला. या मांडणीचे काश्‍मिर खोऱ्यात स्वागतही झाले. पण चार वर्षे झाली गोष्टीची अंमलबजावणी नाही. त्यामुळे तेथील तरूण पिढी संतप्त आहे. हे संवेदनशील राज्य आहे, देशाच्या सीमेवर आहे. संयमाने आणि लोकांच्या भल्यासाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजाणी करून लोकांचा विश्‍वास संपादन करणे आवश्‍यक होते, पण तसे झाले नाही. त्यामुळे तिथे काही लोक एकत्र आहेत, हे देशाच्यादृष्टीने घातक आहे.' 

संस्थांवरील हल्ला चिंताजनक 
"मोदींचा कालखंडाची चिंता वाटत आहे. कारण या शासन काळात संस्थांच्या स्वायत्ततेवर हल्ला होत आहे. राजकीय वापरासाठी हा हल्ला होत असून तो चिंतेचा विषय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींना पत्रकार परिषद घेवून याची माहिती द्यावी लागली. तसेच मोदी सरकारने आणलेले रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सहा महिन्यात राजीनामा दिला. त्यांनी याबाबतचे कारण दिले नाही. मात्र त्यांच्या कामात हस्तक्षेप होत असल्यानेच त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे," असेही पवार यांनी सांगितले. 

लष्करी अधिकाऱ्यांचाही आक्षेप 
" काही दिवसापूर्वीच लष्करातील वरिष्ठ अधिकारी व इतरांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. यात उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी भारतीय सेनेने जे काही शौर्य दाखवले त्यांचे अभिनंदन करताना त्यांनी मोदी सेना असा उल्लेख केला. तसेच सैन्याच्या शौर्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न राज्याकर्त्यांकडून केला जातो. या दोन गोष्टींची खंत लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली. या पत्रावरील सह्या खोट्या आहेत, असे काहींनी सांगितले. मात्र एक-दोन माजी लष्करप्रमुखांनी, या पत्रावर आपली सही असल्याचे सांगितले. देशाच्या संसदीय लोकशाहीला व पंतप्रधानपदाला ही प्रवृत्ती घातक आहे. ही घातक प्रवृत्ती पराभूत केली पाहिजे ," असे आवाहन श्री. पवार यांनी केले. 

म्हणूनच पर्रीकरही स्वगृही 
" राफेल खरेदीत घोटाळा झाल्याची तक्रार झाली. विमानाच्या किंमती तीन वेळा बदलण्यात आल्या. हा सर्व व्यवहार तत्कालिन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना पटला नाही. त्यांनी या पदाचा राजीनामा देवून गोव्याचे मुख्यमंत्री होणे पसंत केले, अशी चर्चा दिल्लीच्या वर्तुळात होती ," असे श्री .  पवार यांनी सांगितले. तसेच राफेल प्रकरणावर जेपीसी नेमण्यास सरकार नकार देत असल्याबददल पवार यांनी टिका केली. 

त्यांना संधीचे सोनं करता आलं नाही 
" मागच्या निवडणुकीत फक्‍त विकास आणि विकास यावरच चर्चा केली. लोकांना वाटलं यांना एक संधी द्यावी. ती संधी मोदींना मिळाली. पण त्या संधीचं सोनं त्यांना करता आलं नाही. हे त्यांच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे मुख्य मुद्यांवरुन लक्ष विचलित करुन वैयक्‍तीक हल्ले करण्यास मोदींनी सुरुवात केली आहे", असे पवार यांनी सांगितले. 

मोदी अपवाद 
" देशातील सैन्याबददल आणि त्यांच्या शौर्याबददल सर्वांना अभिमान आहे. सर्व राजकीय पक्षांनी आजपर्यंत तो अभिमान जपला. याला अपवाद मात्र यावेळचे मोदी सरकार आहे. त्यांच्याकडून जवानांच्या शौर्याचा वापर राजकारणासाठी होत आहे, तरूणांना शहीद जवानांना मत समर्पित करा, असे ते सांगत आहेत हे योग्य नाही," असे श्री. पवार म्हणाले. 

 

संबंधित लेख