mocca action on ranjan vanave | Sarkarnama

बारामतीच्या महिलेला बार्शीत लागला 'मोक्का' 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

बार्शी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीकोनातून गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात कडक पाऊले उचलणार आहोत. 

-सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक, बार्शी 

बार्शी : शहर पोलीसांनी संघटित गुन्हेगारी टोळीवर कारवाईचा बडगा उचलत पाच जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. यातील तिघे बार्शीतील तर दोघे पुणे जिल्हयातील आहेत. यात एका महिलेचा समावेश आहे. 

ज्ञानेश्वर उर्फ बप्पा सुरेश लावंड (वय 31 रा. फुले प्लॉट, बार्शी), उमेश चंद्रकांत मस्तुद (वय 33, रा.सुभाषनगर, बार्शी), रंजना तानाजी वणवे (वय 41, रा.टी.सी.कॉलेज पाठीमागे बारामती जि. पुणे ), अनिल सुधाकर शिंदे (रा.साकत ता.बार्शी) व नितीन उर्फ सोमा अंकुश सोनवणे (वय 20, रा.बेलवाडी ता.इंदापूर जि.पुणे) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. मागच्या महिन्यात नंदकुमार रामलिंग स्वामी याचे पैशासाठी अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी स्वामीने दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त संशयित आरोपींविरोधात बार्शी शहर पोलीसांत अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे आहेत. अपहरणाच्या गुन्ह्यात पोलीसांनी चौघांच्या मुसक्‍या आवळल्या असून ते सध्या सोलापूरात न्यायालयीन कोठडीत आहेत. संशयित आरोपी अनिल शिंदे हा अदयाप गायब आहे. या गुन्ह्यात विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या मंजूरीने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का)अधिनियमाचे कलम लावण्यात आले आहे. 
 

 

संबंधित लेख