MNS`s 12 years : will get strength or downfall? | Sarkarnama

मनसेचे तर नाही वाजणार बारा....!

योगेश कुटे
शुक्रवार, 9 मार्च 2018

सोशल मिडियाच्या जमान्यात अरविंद केजरीवाल यांच्यासारखे नेतृत्त्व दोन ते तीन वर्षांत तयारी करून दिल्लीत सत्ता स्थापन करू शकते. नव्हे राष्ट्रीय पातळीवर आपली दखल घ्यायला भाग पाडते. राज यांनाही मग ते अशक्य आहे, असे अजिबात नाही. फक्त केजरीवाल यांच्यासारखी सामान्यांना हवाहवासा अशी प्रतिमा हवी. राजकारणाविषयी चोवीस तास कमिटमेंट हवी!

पुणे : राज ठाकरे यांच्यासारखा नशिबवान नेता दुसरा नाही. होय नशिबवानच! प्रभावी व्यक्तिमत्व, आक्रमक वक्तृत्त्व, भाषेवर प्रभुत्व, तरुणांमध्ये असलेली क्रेझ, बाळासाहेब ठाकरेंचा वारसा, कलांची जाण असलेला नेता, करिश्‍मा असे सारे गुण त्यांच्याकडे आहेत. यातील अनेक गुण उपजत आहेत. ठाकरी भाषा असो की कुंचला लोकांना त्याचे आकर्षण आहे.

यातील एक-एक गुण मिळवायला  नेत्यांना क्लास लावावा लागतो. तरीही राज ठाकरे हे राजकीय कारकिर्दीत यशाच्या अर्थाने कमनशिबी ठरले आहेत. त्यांनी बरोबर बारा वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना केली होती. त्या पक्षाचा सुरवातीचा झंझावात जबरदस्त होता. आता पुन्हा ते झिरोवर येऊन ठेपले आहेत. बारा वर्षानंतर त्यांना "पुनश्च हरि ओम' करण्याची वेळ आली आहे. 

पक्षाच्या स्थापननेपासून विविध आंदोलनामुळे राज हे चर्चेत राहिले. राज ठाकरेंमध्ये असलेल्या गुणांमुळे 2009 च्या विधानसभा निवडणुकीतच त्यांनी तेरा आमदार निवडून आणून दाखवले. बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीतच 1995 नंतर शिवसेनेची आमदारांची संख्या नीचांकी पातळीवर पोचली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदही शिवसेनेला सोडावे लागले होते. राज ठाकरे यांचा निर्माण झालेला दबदबा पाहून भाजपलाही त्यांच्याशी युती करण्याची तेव्हा गरज वाटत होती. 2012 च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर राज यांना मतदारांनी आणखीन उचलून धरले. बाळासाहेब देखील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राज यांच्या झंझावाताने हबकले होते. माझ्या उद्धवला पदरात घ्या, अशी आर्त हाक त्यांना मुंबईकरांना या निवडणुकीत मारावी लागली होती. या भावनिक आवाहनामुळे शिवसेना आणि भाजपला 2012 च्या निवडणुकीत पुन्हा मुंबईत सत्ता राखता आली.

मोदींच्या उदयाने फरपट

राज यांनी पुणे आणि नाशिकमध्ये दमदार कामगिरी केली आणि लोकांना त्यांचे नेतृत्त्व पसंत असल्याचे दिसू लागले. मात्र या उच्चांकी कामगिरीनंतरच राज यांचा राजकीय घसरणीचा जो प्रवास सुरू झाला तो थांबायचे नावच घेईना. 

नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय पातळीवर उदयाचा फटका सर्वच पक्षांना बसला. त्यात मोदी यांच्याविषयी काय भूमिका घ्यावी, यात राज यांची चूक झाली. ही चूक अर्थात त्यांनी नंतर मान्य केली. शिवसेनेसह सारेच पक्ष मोदींच्या शैलीपुढे धास्तावले होते. मोदी सत्तेवर येऊ चार वर्षे झाल्यानंतर "अच्छे दिन' हे गाजर असल्याचे लोक बोलू लागले. त्यातून राजकीय पक्ष आता आपले अजेंडे पुन्हा सेट करत आहेत. भाजपविरोधात सारे पक्ष एकत्र येण्याची चिन्हे दिसत आहेत. या साऱ्या राजकीय धामधुमीत मनसेचे स्थान काय असणार, यावर आता राज यांचे पुढील राजकीय भवितव्य असणार आहे. 

अजुनी चिंतनात मी!

नरेंद्र मोदी, शरद पवार, अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे दिवसाचे चोवीस तास राजकारण करत असतात किंवा खेळत असतात. त्यांची प्रत्येक कृती राजकीय संदेश देणारीच असते. दुसरीकडे राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आपल्याला झेपेल इतकाच वेळ राजकारणात देतात. मनसेच्या तुलनेत राहुल आणि उद्धव यांची संघटना मोठी आहे. त्यांची स्वतःची फारसे कष्ट करण्याची मानसिक तयारी नाही. हे दोघे जितके स्वस्थ राहू शकतात, तितके स्वस्थ राहण्याची मुभा राज यांना नाही.

शरद पवार आजही महाराष्ट्रातील अमुक नेत्याच्या सत्काराला किंवा तमुक कार्यक्रमाच्या उद्‌घाटनाला जात असतात. सरकार विरोधात "हल्ला बोल' करून ते संघटना व कार्यकर्ते सतत व्यग्र ठेवतात. पण राज यांच्या अजून पक्षाच्या पातळीवर चिंतन बैठकाच चालू आहेत. 

राज यांची पक्ष चालविण्याची पद्धत वेगळी आहे. पवारांसारखे गल्लीत फिरणे त्यांना आवडत नाही. "सौ सोनार की और एक लोहार की', असा त्यांचा खाक्‍या आहे. आमचे ठाकरे कुटुंबीय सारखे लोकांत फिरले तर क्रेझ कमी होईल, असाही राज यांचा समज असावा. 

गल्लीत फिरण्याने काय होईल?

ठाकरे कुटंबांच्या पद्धतीने गेली बारा वर्षे राज यांनी पक्ष चालवला. आता ही पद्धत बदलून पक्ष चालविण्याचा प्रयोग करायला राज यांना हरकत काय आहे? मराठीच्या मुद्यांसह महाराष्ट्राच्या विविध प्रश्‍नांवर वेळोवेळी त्यांनी भूमिका घेणे, संघटनेत जान फुंकणे, कार्यकर्त्यांना व्यग्र ठेवणे, अखंड महाराष्ट्राच्या मुद्यावर वातावरण कायम ठेवणे, शेतकऱ्यांसाठी वेळ देणे अशा अनेक पातळीवर मनसे काम करू शकते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. अशा तरुणांच्या मुद्यांसह मनसे प्रभावी काम करू शकते. शिवसेनेच्या कथित सत्ता सोडण्याच्या नाटकाचा जनतेला कंटाळा आला आहे. त्यामुळे राज यांच्यासाठी योग्य असे "पिच' तयार झाले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला आता फार काळ काही राहिलेला नाही. त्यामुळे आता तरी राज ठाकरेंनी दिवसांतील 24 तास राजकारण करायला काहीच हरकत नाही. 

शैली बदलून पाहावी!

शरद पवार यांची मुलाखत घेऊन राज यांनी वेगवेगळे राजकीय संदेश दिले आहेत. पवारांनीही त्यांचे तोंड भरून कौतुक करून राज हे कसे तरुणांचे लाडके आहेत, हे स्पष्टपणे सांगितले आहे. म्हणूनच स्वतः राज यांच्याकडे पद नसले तरी ते एक महाराष्ट्रातील प्रभावी नेते आहेत, हे पवारांनीही सांगितले आहे. आमदार, नगरसेवक अशी पदे असलेले कार्यकर्तेही आता राज यांच्याकडे नाहीत. तरीही ते असे अनेक आमदार, नगरसेवक ते मनसेच्या माध्यमातून उभे करतात. भाषणातील त्यांचे टायमिंग परफेक्‍ट असते. फक्त राजकारणाचे टायमिंग त्यांना जमलेकी मनसे बाळसे धरील यात शंका नाही. राज यांनी त्यांच्या जुन्याच पद्धतीने पक्ष चालवला तर बारा वाजलेच म्हणून समजा!  

सोशल मिडियाच्या जमान्यात अरविंद केजरीवाल यांच्यासारखे नेतृत्त्व दोन ते तीन वर्षांत तयारी करून दिल्लीत सत्ता स्थापन करू शकते. नव्हे राष्ट्रीय पातळीवर आपली दखल घ्यायला भाग पाडते. राज यांनाही मग ते अशक्य आहे, असे अजिबात नाही. फक्त केजरीवाल यांच्यासारखी सामान्यांना हवाहवासा अशी प्रतिमा हवी. राजकारणाविषयी चोवीस तास कमिटमेंट हवी!
 

संबंधित लेख