अजितदादा व राज ठाकरे भेटीने पुरंदरच्या मनसैनिकांना आनंदाच्या उकळ्या

मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आग्रही आहेत. याचा परिणाम स्थानिक पातळीवर होण्याची चिन्हे आहेत. ही युती झाली तर पुणे जिल्ह्यातील पुरंदर-हवेली मतदारसंघातील गणित मनसेच्या बाजूने सुटण्याची अपेक्षा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आहे.
अजितदादा व राज ठाकरे भेटीने पुरंदरच्या मनसैनिकांना आनंदाच्या उकळ्या

पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे महाआघाडीत सहभागी होण्याविषयी चर्चा सुरू झाली आहे. मनसे आघाडीत येवो अथवा न येवो पण या दोन नेत्यांच्या भेटमुळे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मनसेला मात्र आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत.

हे उकळ्या फुटण्याचे कारणही तसेच आहे. मनसेला आघाडीत घेण्याचा अजित पवार यांचा आग्रह आहे. मात्र लोकसभेपेक्षा मनसेचे लक्ष विधानसभेकडे जास्त आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची ताकद असलेल्या मतदारसंघांत पुरंदरचा समावेश आहे. येथून मनसेच्या शेतकरी आघाडीचे प्रमुख बाबाराजे जाधवराव यांनी आधीच निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. 

मनसे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस एकत्र आले तर पुरंदरमध्ये शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांना रोखणे शक्य होईल, असा त्यामागे अंदाज आहे. जाधवराव यांनी येथे बेरोजगारीच्या विरोधात दुष्काळी उपाययोजनांच्या मागणीसाठी नुकताच मोठा मोर्चा काढला होता. त्यातून जाधवराव यांनी शक्तिप्रदर्शन केले. जाधवराव यांची या मतदारसंघात पारंपरिक ताकद आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीला येथे ताकद असूनही आणि बराच प्रयत्न करूनही ही जागा जिंकता येत नाही. त्यामुळे ही जागा मनसेला दिल्यास त्याचा उपयोग होईल, असा मनसेचा युक्तिवाद आहे.  

राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांत भांडणे असल्याने त्यातून कोणाला उमेदवारी द्यायची, असा नेहमीच प्रश्न उपस्थित राहतो. आता म्हाडाचे माजी व्यवस्थापकीय संचालक संभाजीराव झेंडे यांचे नाव नव्याने पुढे करण्यात आले आहे. झेंडेदेखील पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. मात्र त्यांच्या गावातील ग्रामपंचायतही त्यांच्या ताब्यात नसल्याकडे त्यांचे विरोधक लक्ष वेधतात. 

बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला सहकार्य करण्याच्या बदल्यात पुरंदरची जागा मनसेला सोडण्याचा पर्याय पुढे येऊ शकतो. त्यामुळे या दोन नेत्यांच्या भेटीनंतर विधानसभेचीही गणित आपल्या बाजून झुकेल, अशी अपेक्षा मनसेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com