आंकाक्षा देशमुख खून प्रकरणानंतर मनसे परप्रांतीयांच्या विरोधात आक्रमक 

deshmukh-mns
deshmukh-mns

औरंगाबादः एमजीएम महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉ.आंकाक्षा देशमुख हिच्या मारेकऱ्याला पोलीसांनी उत्तर प्रदेशातून नुकतीच अटक केली. चोरीच्या उद्देशाने राहूल शर्मा या परप्रांतीय बांधकाम मजुराने आकांक्षाचा गळा दाबून खून केला होता. या प्रकरणानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना परप्रांतीयाच्या विरोधात पुन्हा आक्रमक होण्याच्या तयारीत आहे. 
 

शहरातील बांधकाम व्यावसायिकांसह जिथे कुठे परप्रांतीय कामगार काम करत असतील त्यांची नोंदणी कामगार आयुक्त कार्यालयात बंधनकारक करा अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. पंधरा दिवसांत नोंदणी बंधनकारक करून शहरात व औद्योगिक क्षेत्रात किती परप्रांतीय कामगार कार्यरत आहेत याची माहिती न दिल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील मनसेने दिला आहे. 

मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्या नेतृत्वाखाली अन्य पदाधिकाऱ्यांनी नुकतीच कामगार आयुक्तांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवदेन दिले. आकांक्षा देशमुख हीचा खून राहूल शर्मा या परप्रांतीय तरूणाने केल्याचे नुकतेच उघडकीस आले. एमजीएम वसतीगृहा शेजारी सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामावर शर्मा हा मजूर म्हणून काम करत होता. 

या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा मनसेने परप्रांतीयांचा मुद्दा उपस्थित केला आहे. कामगारा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात वाळूजसह शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये घडणाऱ्या 60 ते 70 टक्के गुन्ह्यांमधील आरोपी हे परप्रांतीय असल्याचा दावा केला आहे. बाहेरच्या राज्यातून कामगार इथे येतात, गुन्हे करून पळून जातात. पण त्यांची नोंदच केली जात नाही आणि हा अतिशय गंभीर प्रकार असल्याचे या निवदेनात म्हटले आहे. 

बांधकाम व्यवासियक असतील किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात जिथे परप्रांतीय कामगार काम करतात अशा सगळ्यांची नोंदणी कामगार आयुक्तांकडे करणे बंधनकारक करा अशी प्रमुख मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. 

ज्यांच्याकडे परप्रांतीय कामगार काम करतात अशा सर्वच व्यापारी, उद्योजकांना त्यांची नोंदणी कामगार आयुक्त कार्यालयात सक्तीचे करा. यासाठी पंधरा दिवसांची मुदत आम्ही देत आहोत, या उपरही परप्रांतीयांच्या नोंदणी संदर्भात कारवाई झाली नाही, तर मग मनसे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील निवदेनाद्वारे देण्यात आला आहे. 

मराठवाड्यात आणि राज्याच्या अनेक भागात दुष्काळ आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांच्या हाताला काम नाही, तर दुसरीकडे नियम डावलून अनेक कंपन्यांमध्ये परप्रांतीयांची भरती केली जाते. 

कुठल्या कंपन्यांमध्ये असे नियमबाह्य परप्रांतीय कामगार कार्यरत आहे, त्यांचा शोध घेऊन तातडीने त्यांची हाकलपट्टी करावी आणि त्यांच्या जागी स्थानिक तरूणांना नोकरी द्या अशी मागणी देखील मनसेने केली आहे. 

मनसे नेहमीच आक्रमक आंदोलन करते, तोडफोड करते असा आमच्यावर आरोप केला जातो. त्यामुळे आम्ही लोकशाही मार्गाने कामगार आयुक्त, एमआयडीसी कार्यालयाला निवेदन देऊन पंधरा दिवासांची मुदत देखील दिली आहे.

यानंतरही नियम डावलून पप्रांतीय कामगार कंपन्या व बांधकाम व्यवसायिकांकडे काम करतांना आढळून आले तर मग मनसे आपल्या पध्दतीने आंदोलन करेल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी सरकारनामाशी बोलतांना दिला. 

आंकाक्षा देशमुख हिचा मारेकरी राहूल शर्मा याचे वकीलपत्र कुणीही घेऊ नये असे आवाहन देखील मनसेच्या वतीने जिल्हा न्यायालयातील वकीलांना करण्यात आले आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com