'मनसे'चे राज फेसबुकवरुन खुलणार! : सोशल मिडियातून फेसव्हॅल्यू मिळवेन : राज ठाकरे

राज यांनी पुन्हा एकदा उभारी घेण्याचे ठरवलेले दिसते. म्हणूनच त्यांनी आता पक्षाच्या नेतेमंडळींशी चर्चा न करता थेट कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याचे सूत्र अवलंबले आहे. या कार्यकर्त्यांना कुठल्या 'मध्यस्थां'विना आपणाशी संपर्क साधता यावा, यासाठी ते कार्यकर्त्यांना आपला ई-मेल आयडी आणि खास मोबाईल क्रमांकही देणार आहेत. ही मनसे अंतर्गतच्या नव्या लोकशाहीची चिन्हे असावीत.
'मनसे'चे राज फेसबुकवरुन खुलणार! : सोशल मिडियातून फेसव्हॅल्यू मिळवेन : राज ठाकरे

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सुरुवातीच्या काळात उधळलेला वारु आता आटोक्यात आला आहे. किंबहुना तो दुडक्या नव्हे तर लंगड्या चालीने चालतो आहे. राज ठाकरे यांच्या मते प्रसारमाध्यमेही एकांगी झाली आहेत. अशा वेळी पक्षसंघटनेला आणि स्वतःच्या 'इमेज'ला बळकटी देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मिडियाचा आधार घेण्याचे ठरवले आहे. येत्या 27 सप्टेंबरला राज यांचे 'फेसबूक पेज' सुरु होणार असल्याचे खुद्द राज यांनीच सांगितले आहे.
.
9 मार्च 2006 रोजी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज यांना मोठे समर्थन मिळाले. अऩेक शिवसैनिक त्यांच्या नव्या पक्षसंघटनेत प्रवेश करते झाले. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडूऩ आले. 2012 च्या महापालिकांतही मनसेला घवघवीत यश मिळाले. मुंबई (27), ठाणे (7), पुणे (29), नाशिक (40), कल्याण-डोंबिवली (26), असे मनसेचे नगरसेवक निवडले गेले. अन्य काही महापालिकांतही मनसेने आपले अस्तित्व दाखवून दिले.

पण नंतरच्या काळात पक्षसंघटनेला घरघर लागली. आलेल्या मोदी लाटेत पक्षाची पार वाताहत झाली. या वर्षी म्हणजेच 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांतही मनसेला मोठा फटका बसला. मुख्य म्हणजे नाशिक महापालिकेत मिळालेली सत्ता मनसेला गमवावी लागली. नाशिकमध्ये मनसेचे अवघे पाच उमेदवार निवडूऩ आले. अऩ्य ठिकाणीही हीच अवस्था होती. मुंबई (7), ठाणे (0), पुणे (2), कल्याण डोंबिवली (10) अशी मनसेची स्थिती झाली. राज यांचा करिष्मा राहिला नसल्याचे बोलले जाऊ लागले.

हाती घेतलेली टोल सारखी आंदोलने अर्धवट सोडल्याचेही राज यांच्यावर आरोप झाले. 'राज मॅनेज झाले,' असा सूर काही माध्यमांतूनही उमटायला लागला. मधल्या काळात मनसेची प्रतिमा 'खळ्ळ् खट्याक' पक्ष अशी बनली. राज यांनी परप्रातियांविरुद्ध छेडलेली आंदोलनेही मराठी तरुणांची मने जिंकून गेली. पण या साऱ्या प्रवासात पहिली काही वर्षे सोडली तर या मराठी मनांचे मतांमध्ये रुपांतर मनसेला करता आले नाही, ही वस्तुस्थिती राहीली.

पण राज ठाकरे यांचा धीर अद्याप खचलेला नाही हे आज त्यांच्याशी बोलताना जाणवले. पुण्यात आज पक्षाचे शाखा प्रमुख-उपशाखाप्रमुख यांच्या बैठकीपूर्वी राज यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी 'चाय पे चर्चा' केली. राज हे एकूणच सध्याच्या माध्यमांवर प्रचंड नाराज असल्याचे त्यांच्या बोलण्यातून उघड झाले. आपल्या या भावना त्यांनी तीव्र शब्दांत व्यक्तही केल्या. ही माध्यमे आजकाल भाजपच्या भोवती पिंगा घालत आहेत, असाच राज यांच्या बोलण्याचा एकूण सूर होता आणि मनसेकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही त्यातून डोकावत होती.

पण राज यांनी पुन्हा एकदा उभारी घेण्याचे ठरवलेले दिसते. म्हणूनच त्यांनी आता पक्षाच्या नेतेमंडळींशी चर्चा न करता थेट कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याचे सूत्र अवलंबले आहे. या कार्यकर्त्यांना कुठल्या 'मध्यस्थां'विना आपणाशी संपर्क साधता यावा, यासाठी ते कार्यकर्त्यांना आपला ई-मेल आयडी आणि खास मोबाईल क्रमांकही देणार आहेत. ही मनसे अंतर्गतच्या नव्या लोकशाहीची चिन्हे असावीत.

एवढ्यावरच न थांबता 'हे ही दिवस जातील...' असे राज ठाकरे सांगतात. आलेले 'बुरे दिन' घालवण्यासाठी आता राज ठाकरे 'फेसबुक पेज'चा आधार घेणार आहेत. हे 'फेसबूक पेज' येत्या 27 सप्टेंबरला अवतरणार आहे. राज यांची व्यंग्यचित्रे या 'फेसबूक' पेजवर असतीलच पण मनसेची पुढची वाटचाल, ध्येय धोरणेही या द्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्याचा राज यांचा प्रयत्न आहे. 'रोजच्या रोज प्रेस काॅन्फरन्स घेणे शक्य नाही,' असेही राज यांचे म्हणणे आहे. थोडक्यात माध्यमांपासून चार हात दूर राहण्याचा आणि थेट लोकांशी संवाद साधण्याचा राज यांचा मानस दिसते.

21 सप्टेंबरला 'ठाकरी बाँब' कुणावर फुटणार?
सध्या मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक अशा प्रमुख शहरांमधल्या कार्यकर्त्यांकडून राज त्यांची मते जाणून घेत आहेत. या मंथनातून नक्की काय निघणार, त्याचे परिणाम कुठल्या पदाधिकाऱ्यांना भोगावे लागणार, पक्षात कुठली नवी पदे निर्माण होणार आणि मुख्यतः मनसेची पुढची वाटचाल कशी राहणार यावर राज ठाकरे थेट 21 सप्टेंबरला मुंबईत भाष्य करणार आहेत. मनसेच्या तोफांचा रोख कुणावर असेल हे त्याच दिवशी ठरेल. 'या दरम्यान भाजप-सेनेत फूट पडली नाही म्हणजे मिळवली,' असेही राज मिस्किलपणे म्हणाले. ही माहिती होती का अंदाज होता, हे मात्र त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होऊ शकले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com