कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मनसे येण्याच्या चर्चेने पुरंदरचे राजकारण ढवळले... 

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मनसे येण्याच्या चर्चेने पुरंदरचे राजकारण ढवळले... 

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेले राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या आघाडीत सहभागी करून घेण्याच्या चर्चेने पुणे जिल्ह्यातील दोन मतदारसंघात त्याचा परिणाम होणार आहे. त्यातील जुन्नर या मतदारसंघात मनसेचाच आमदार आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा मिळाल्यास विद्यमान आमदार शरद सोनवणे यांना आकाश ठेंगणे होईल. दुसरीकडे पुरंदर हा मतदारसंघ मनसेकडे मिळेल, अशी आशा मनसेचे शेतकरी आघाडीचे प्रमुख बाबा जाधवराव यांना आहे. 

पुरंदर या विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात आहे. तरीही येथे राष्ट्रवादीला 2004 चा अपवाद वगळता विधानसभा निवडणुकीत यश मिळाले नाही. राष्ट्रवादीची स्थापना होण्याआधी हा मतदारसंघ कॉंग्रेसलाही आपल्याकडे राखता आला नाही. येथे जनता दलाचे दादा जाधवराव यांनी 1985 ते 2004 पर्यंत वर्चस्व राखले. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी 2009 पासून हा मतदारसंघ शिवसेनेकडे खेचून आणला आहे. या मतदारसंघात कॉंग्रेसचीही ताकद आहे. मात्र त्यांनाही येथे यश मिळवता आहे. 

जाधवराव यांना मानणारा मोठा वर्ग या तालुक्‍यात आहे. या हक्काच्या मतांच्या जोरावर जाधवराव यांचे राजकारण अजून तालुक्‍यात टिकून आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे यांची युती झाल्यास त्याचा सर्वाधिक पडसाद या मतदारसंघात उमटतील. कारण या तीनही पक्षांचे नेते आतापर्यंत एकमेकांच्या विरोधात लढत आले आहेत. (राष्ट्रवादीतील नेते तर आपल्याच नेत्यांच्या विरोधात लढतात.) त्यांच्या एकत्रित प्रचाराला मतदार भुलणार का, हा प्रश्‍नच असेल. 

कॉंग्रेसचे संजय जगताप आणि जाधवराव यांचे कधीच जमले नाही. राष्ट्रवादीचे अशोक टेकवडे, विजय कोलते, दिगंबर दुर्गाडे, सुदाम इंगळे, जालिंदर कामठे असे अनेक नेते येथे आहेत. त्यांचेही जाधवराव किंवा जगतापांशी जमले नाही. खरोखरीच हे नेते मनसेच्य प्रचारासाठी उद्या एकत्रित बाहेर पडले तर या तीनही एकत्रित पक्षांची ताकद शिवसेनेपेक्षा नक्कीच जास्त दिसून येईल. मात्र कागदावरील एकत्रित शक्ती या तालुक्‍यात मतांत कधीच दिसून येत नसल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सूचना देऊन हे नेते एकत्र प्रचार करतील. मात्र नंतर कोणत्या खेळ्या खेळणार यावर येथील निकालाचे चित्र अवलंबून राहील. 

विधानसभा निवडणुकीत 2004 पासून जाधवराव यांचा पराभव होत आला आहे. 2014 च्या निवडणुकीत बाबा जाधवराव यांच्या भगिनी संगिताराजे निंबाळकर या भाजपकडून उभ्या असल्याने बाबा जाधवराव यांना मनसेची उमेदवारी मिळूनही त्यांनी निवडणूक लढविण्याचे नाकारले होते. आता मनसेकडून त्यांची उमेदवारी निश्‍चित आहे. त्यांनी तयारीही सुरू केली आहे. मनसेच्या इंजिनाला येथे घड्याळाची आणि हाताची ताकद मिळाली तर शिवतारे यांना ते चांगले आव्हान देऊ शकतील. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप हे आपल्या पक्षाचा आदेश मानणार का आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते मदत करणार का यावर इंजिनाची वाटचाल अवलंबून राहील.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com