mns dilip lande shisvsena mumbai | Sarkarnama

मनसेतील अन्यायामुळेच शिवसेनेत प्रवेश : लांडे

विष्णू सोनवणे 
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

मुंबईः पैसे घेऊन आम्ही शिवसेनेत प्रवेश केलेला नाही. मनसेमध्ये तीन वर्षांपासून सतत डावलले जात होते, अन्याय होत होता. आमची व्यथा ऐकून घेतली जात नव्हती. कोणतीही सूचना न देता दिलेली पदे काढून घेण्यात आली. अखेर कंटाळून आम्ही शिवसेनेचा पर्याय निवडला, असे मनसेतून शिवसेनेत गेलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी "सरकारनामा'ला सांगितले. 

मुंबईः पैसे घेऊन आम्ही शिवसेनेत प्रवेश केलेला नाही. मनसेमध्ये तीन वर्षांपासून सतत डावलले जात होते, अन्याय होत होता. आमची व्यथा ऐकून घेतली जात नव्हती. कोणतीही सूचना न देता दिलेली पदे काढून घेण्यात आली. अखेर कंटाळून आम्ही शिवसेनेचा पर्याय निवडला, असे मनसेतून शिवसेनेत गेलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी "सरकारनामा'ला सांगितले. 

दिलीप लांडे यांच्यासोबत अश्‍विनी माटेकर, परमेश्‍वर कदम, दत्ता नरवणकर, डॉ. अर्चना भालेराव, हर्षला मोरे या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महापालिकेतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. या नगरसेवकांनी शिवसेनेकडून पैसे घेतल्याचा आरोप करत भाजप आणि मनसेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कारवाईची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाकडून महापालिका आयुक्तांना येणाऱ्या पत्राकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. या आरोपांबाबत लांडे यांनी "सरकारनामा' कडे आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. 

ते म्हणाले, की आम्ही कुणाकडूनही पैसे घेतलेले नाहीत. पक्षांतर केलेले सर्व नगरसेवक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. पैशांसाठी आम्ही विकले जाणारे नाही. मनसेमध्ये आम्ही निष्ठेने काम केले. पक्षाला कोणताही जनाधार नसताना आम्ही निवडून आलो. आम्ही पक्ष बळकट केला. पक्षातले भले भले पडले. दादरमध्ये मराठी माणसे असताना संदीप देशपांडे यांना आपल्या पत्नीलाही निवडून आणता आले नाही. उलट देशपांडे यांना आम्ही डोक्‍यावर घेतले. त्यांचे धंदे त्यांना लखलाभ असोत असे लांडे उद्वेगाने म्हणाले. 

सात नगरसेवकांनी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली काम करावे असे आदेश पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले होते. मी महापालिकेत गटनेता असताना फक्त नामधारी राहिलो. पश्‍चिम रेल्वेवर काढलेल्या मोर्चाच्या वेळी महापालिका आयुक्तांची भेट घेतानाही मला डावलले. पक्षाच्या विभाग अध्यक्ष पदावरून कधी डावलले हे आम्हालाही कळले नाही. कसलाही जनाधार नसलेल्यांची विभाग अध्यक्ष म्हणून त्यांनी नेमणूक केली. पदांवर नियुक्ती करताना कधीही विश्‍वासात घेतले नाही. तीन वर्षे सतत अन्याय होत राहिला. या अन्यायाला कंटाळून आम्ही शिवसेनेत प्रवेश केला असे लांडे यांनी सांगितले. 

बडव्यांचे कोंडाळे मनसेच्या मुळावर 

राज ठाकरे बडव्यांच्या कोंडाळ्यात सापडले आहेत. कुठेही जनाधार नसलेले हे कोंडाळे आहे. ते राज ठाकरेंपर्यंत नगरसेवकांना पोहचू देत नाहीत. आमचा राग राज यांच्यावर नसून या बडव्यांवर आहे. हे बडवेच आता पक्षाच्या मुळावर उठले आहेत. कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना पक्षात सन्मान नाही. नवे पदाधिकारी लादले जात आहेत. पक्षात मोठा असंतोष आहे असे लांडे यांनी सांगितले. 

कोणतेही बार्गेनिंग नाही 
शिवसेनेत प्रवेश करताना कोणतेही बार्गेनिंग केलेले नाही. 2019 मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीबाबतही काही बोलणे केले नाही; मात्र मुंबई महापालिकेत आणि राज्यात शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाकलेल्या विश्‍वासाला पात्र ठरेन, शिवसेनेने संधी दिली त्याचे सोने करू, असा विश्‍वास नगरसेवक लांडे यांनी व्यक्त केला. 
 

संबंधित लेख