mns-campaign-against-barane | Sarkarnama

मनसेने उघडली बारणेंविरोधात मोहीम

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 एप्रिल 2019

मावळ आणि शिरुरमधील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे व शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या विरोधात मनसेने भुमिका आज जाहीर केली. यामुळे या दोघांच्या अडचणीत वाढ झाली आहे. निव्वळ विरोधी भूमिकाच घेणार नसून, त्यांच्या विरोधात प्रचारही करणार असल्याचे मनसेचे पिंपरी-चिंचवड प्रभारी किशोर शिंदे, अॅड. गणेश सातपुते,रणजित शिरोळे यांनी सांगितले.

पिंपरीः मावळ आणि शिरुरमधील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे व शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या विरोधात मनसेने भुमिका आज जाहीर केली. यामुळे या दोघांच्या अडचणीत वाढ झाली आहे. निव्वळ विरोधी भूमिकाच घेणार नसून, त्यांच्या विरोधात प्रचारही करणार असल्याचे मनसेचे पिंपरी-चिंचवड प्रभारी किशोर शिंदे, अॅड. गणेश सातपुते,रणजित शिरोळे यांनी सांगितले.

मोदी,शहा आणि शिवसेनाही नको, असे कोपरा सभा घेऊन सांगणार असल्याचे ही शहर प्रभारी त्रयी म्हणाली. मोदी,शहा,बारणे,आढळराव का नको यासाठी मनसे पदयात्रा,बाईक व मोटार रॅली काढणार आहे. घरोघरी मनसैनिक जाणार आहे. 21 तारखेला मेळावाही घेणार आहे, असे ते म्हणाले. त्याचा फायदा राष्ट्रवादीला होणार असल्याची कबुलीही त्यांनी दिली. या भुमिकेसाठी राष्ट्रवादीने रसद पुरविल्याचा, मात्र त्यांनी इन्कार केला. मनसे तेवढी समर्थ असल्याचे ते म्हणाले. आम्ही राष्ट्रवादीच्या स्टेजवर जाणार नसून आमची भुमिका स्वतंत्र मांडणार आहे, असा खुलासा त्यांनी केला.

एनडीएतील सर्व घटक पक्षांना मनसेचा विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मावळसाठी पनवलेला, तर शिरूरसाठी पुण्यात राज यांची सभा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मोदी, शहामुक्त भारताची घोषणा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी का  घेतली व त्यासाठी काय करणार आहे, हे सांगण्यासाठी शनिवारी त्यांच्या वरील तीन शिलेदारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेतली. 

यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले व इतर पदाधिकारी उपस्थित होते. लोकसभा न लढविता मनसे प्रचारात का उतरली असे विचारले असता, ही सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजण्यास हरकत नाही, असे ते म्हणाले. मोदी व शहामुक्त भारत झाला की नाही, हे 23 मे रोजी मतमोजणीतून कळून येईल, असेही त्यांनी सांगितले.
 

संबंधित लेख