MNS on Backseat in Ahmednagar | Sarkarnama

नगरमध्ये मनसेची पडझड

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 11 मे 2017

देशभरात भारतीय जनता पक्षाची घोडदौड सुरू असताना जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचे स्थान बऱ्यापैकी टिकून आहे. या घडामोडीत मनसेची मोठी अडचण झाली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीने जागा मिळविल्या असल्या, तरी मनसे बॅकफूटवर पडली आहे.

नगर - देशभरात भारतीय जनता पक्षाची घोडदौड सुरू असताना जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचे स्थान बऱ्यापैकी टिकून आहे. या घडामोडीत मनसेची मोठी अडचण झाली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीने जागा मिळविल्या असल्या, तरी मनसे बॅकफूटवर पडली आहे.

महानगर पालिकेत तर चारच सदस्य असलेल्या मनसेला गळती लागली. नगरसेवक किशोर डागवाले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ही पडझड सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. डागवाले मनसेच्या चिन्हावर निवडून आले होते. मागील काही महिन्यांपासून ते काहीसे पक्षापासून दुरावले. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तेथेही ते रमले नाहीत. शेवटी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मनसेच्या इतर नगरसेवकांसमवेत डागवाले यांचे संबंध चांगले आहेत.

त्यापैकी गणेश भोसले शिवसेना किंवा भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत आहेत. उर्वरीत दोन नगरसेविका विना बोज्जा व सुवर्णा जाधव यांचे पती डागवाले यांचे चांगले मित्र असल्याने त्यांचाही कल बदलण्याची शक्यता आहे. साहजिकच मनसेची अवस्था अधिक बिकट होईल, अशी भिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आहे. मनसेकडे प्रारंभी आकर्षित झालेला तरुणवर्गही मागील काही महिन्यांपासून पक्षापासून दुरावला आहे. डागवाले यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मनसेमध्ये चिंता अधिक वाढली आहे.

 

संबंधित लेख