कार्यकर्ते " मनसे' कामाला लागल्यामुळे औरंगाबादचा दंडुका मोर्चा यशस्वी

 कार्यकर्ते " मनसे' कामाला लागल्यामुळे औरंगाबादचा दंडुका मोर्चा यशस्वी

औरंगाबाद : मराठवाड्यात जम बसवू पाहणाऱ्या मनसेला आतापर्यंत गटातटाच्या राजकारणामुळे फारसे यश मिळाले नव्हते. पण राज ठाकरे यांनी महिनाभरात केलेले दौरे, खास ठाकरे शैलीत केलेले मार्गदर्शन याचा चांगला परिणाम औरंगाबादमधील दंडुका मोर्चाच्या निमित्ताने दिसून आला. कार्यकर्ते " मनसे' कामाला लागल्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरचा पहिला मोर्चा जमलेल्या गर्दीवरून तरी यशस्वी ठरला असे म्हणावे लागेल. 

राज ठाकरे यांच्या करिश्‍म्यावर 2009 मध्ये जे कमावले ते पुढच्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत गमावण्याची नामुष्की मनसेवर ओढावली होती. नाशिक महापालिकेतील सत्ता गेली, मुंबई महापालिकेतील नगरसेवक, राज्यातील आमदारांची संख्याही घटली, त्यामुळे मराठी आणि परप्रांतीयांच्या मुद्यावरून आक्रमक झालेली मनसे दरम्यानच्या काळात कोमजून गेली होती. 

नगरेसवक, आमदारांची संख्या कमी झाली तरी राज ठाकरे यांच्यांजवळचे कार्यकर्त्यांचे मोहळ कायम होते. पण कुठालाच ठोस कार्यक्रम पक्षाकडून दिला जात नसल्यामुळे त्यांच्यात एक प्रकारची मरगळ आली होती. फिनिक्‍स भरारी घ्यावी तसा राज ठाकरे यांनी पुन्हा कार्यकर्त्यांच्या मनात विश्‍वास निर्माण केला आणि त्यांना कामाला लावले. मुंबई, पुणे, नाशिक पुरता विचार न करता राज ठाकरे यांनी पुन्हा मराठवाड्याकडे आपले लक्ष वळवले. 

पक्षातील गटतट, हेवेदावे मिटवण्यासाठी सगळी कार्यकारणी बरखास्त करत, नवा भिडू नवा राज मांडला. त्या त्या जिल्ह्यातील स्थानिक समस्या, प्रश्‍नांचा अभ्यास आणि त्यावर नाशिक पॅटर्नचा उतारा असा कार्यक्रम आणि त्या सोबतच शेतकरी, कष्टकऱ्यांच्या प्रश्‍नावर आक्रमक होण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मराठवाड्यातील कार्यकर्त्यांना दिले. 

थेट भेटीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह.. 
औरंगाबादसह मराठवाड्यातील कार्यकर्त्यांना थेट जाऊन भेटायचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला. डॉक्‍टर, वकील, अभियंते, अधिकारी, तज्ञांच्या भेटीगाठी घेत मनसेचे व्हिजन दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी नाशिक मॉडेलचा खुबीने वापर करत त्यांनी मनसे फक्त खळखट्याकच नाही, तर विकासाच्या मार्गावरही चालते हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. 

मनसे कार्यकर्ते प्रामाणिकपणे कामाला लागले आहेत, हे तुम्हाला येत्या दोन महिन्यात दिसून येईल अस राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील व्हिजन मराठावाडा कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगितले होते. त्यानंतर मनसेच्या वतीने शहरात नागरी प्रश्‍नावर अनेक आंदोलन झाली. त्यानंतर दंडुका मोर्चाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाला हात घालत मनसेने आणखी एक पाऊल पुढे टाकले. 

नेते, पदाधिकाऱ्यांची लिटमस टेस्ट.. 
मराठवाडास्तरीय दंडुका मोर्चाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मनसेचे नेते आणि मराठवाड्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची एकप्रकारे लिटमस टेस्टच घेतल्याचे दिसून आले. दंडुका मोर्चाचे नियोजन आणि त्यासाठी नेत्यांनी मराठवाडाभर दौरे केले. राज ठाकरे आणि लाखोंची गर्दी हे समीकरण असले, तरी त्यांच्या अनुपस्थितीत नेते, पदाधिकाऱ्यांच्या ताकदीवर किती गर्दी जमू शकते हे देखील औरंगाबादेतील दंडुका मोर्चाच्या निमित्ताने समोर आले. 

मनसेचे राज्य उपाध्यक्ष जावेद शेख यांच्यासह मुंबईतील अभिजीत पानसे, शालिनी ठाकरे, अनिल शिदोरे, राजू पाटील, अमेय खोपकर, संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या दंडुका मोर्चात आठ ते दहा हजारांची गर्दी जमली. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर मनसेने काढलेला हा मराठावाड्यातील सर्वाधिक गर्दी असलेला पहिला मोर्चा ठरला. त्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांना देखील मनसेच्या दंडुक्‍याचा धसका घ्यावा लागेल. 

मोर्चा यशस्वी करण्याचे शिवधनुष्य मुंबईतून आलेल्या नेते, पदाधिकाऱ्यांवर होते. मराठवाड्यातील मनसे कार्यकर्त्यांच्या ताकदीवर ते पेलले गेले, त्यामुळे नेते आनंदाने मुंबईला परतले. तर मोर्चा चांगली गर्दी जमल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांचा उत्साह देखील द्विगुणीत झाला. हजारोंच्या संख्येने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जमलेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांसमोर मुंबईतून आलेल्या नेत्यांची भाषण झाली. 

" दंडुक्‍याचा वापर कधी आणि कसा करायचा हे आम्ही बळीराजाला वेळ आल्यावर सांगू ' असे सांगत त्यांनी उपस्थितांच्या टाळ्याही मिळवल्या. मोर्चा यशस्वी झाला असला तरी शेतकऱ्यांचे जे प्रश्‍न घेऊन मनसेने दंडुका हाती घेतला, त्याने बळीराजाचे प्रश्‍न खरच सुटणार का? हे पाहणेही आता महत्वाचे ठरणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com