MNS Agitation at Kalyan Railway Station | Sarkarnama

कल्याण स्टेशनपरिसरात मनसेचे 'खळ्ळखट्याक'

रविंद्र खरात
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

कल्याण पश्चिममध्ये आज सकाळी मनसेने फेरीवाल्याविरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. यावेळी काही फेरीवाल्यांच्या सामानाची तोडफोड केली तर काहींना पिटाळून लावले. यामुळे काही काळ स्टेशन परिसरात तणावाचे वातावरण होते.

कल्याण : कल्याण पश्चिममध्ये आज सकाळी मनसेने फेरीवाल्याविरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. यावेळी काही फेरीवाल्यांच्या सामानाची तोडफोड केली तर काहींना पिटाळून लावले. यामुळे काही काळ स्टेशन परिसरात तणावाचे वातावरण होते.

मुंबईमधील एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनाला 15 दिवसांची डेडलाईन दिली होती. त्यामुळे आजपासून विविध शहरात मनसेने आंदोलन केले. आज (शनिवार)  कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन जवळील स्कायवॉक, एसटी डेपो परिसर फुटपाथ, दीपक हॉटेलच्या बाजूच्या फुटपाथ परिसरामध्ये मनसे माजी आमदार प्रकाश भोईर, शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई, काका मांडले, उल्हास भोईर समवेत शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत दणाणून सोडला. मनसे आंदोलन करणार याची कुणकुण लागल्याने स्कायवॉकवरील फेरीवाले गायब होते. यामुळे मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फुटपाथवरील फेरीवाल्यांना हाकलण्यास सुरुवात केली .यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. यावेळी स्टेशन परिसरात पालिका फेरीवाला विरोधी पथक आणि कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

पुन्हा फेरीवाले...
मनसेच्या आंदोलनामुळे स्कायवाकवरील फेरीवाल्यांनी धसका घेत पुन्हा बसले नाही. मात्र स्कायवॉक खालील फुटपाथवर फेरीवाले पुन्हा बसले होते. त्यामुळे मनसेच्या आंदोलनाला घाबरत नाही का? असा सवाल केला जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरीवाले बाबत रेल्वे, पालिका प्रशासनाला 15 दिवसाची मुदत दिली होती. त्याची डेडलाईन संपल्याने मनसे कार्यकर्ता आक्रमक झाला आहे. सुदैवाने स्कायवॉकवर आज फेरीवाले नव्हते. मात्र स्कायवॉकखालील फुटपाथ वरील फेरीवाल्याना पिटाळून लावले. मात्र यापुढे फेरीवाला बसला आणि मनसेच्या कार्यकर्त्याने आंदोलन करून उद्रेक झाला. तर त्याला रेल्वे प्रशासन आणि पालिका जबाबदार राहील असा इशारा मनसे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी दिला असून नागरिकांना आवाहन केले की फुटपाथ आणि स्कायवाक वरील फेरीवाल्याकडून वस्तू खरेदी करू नये.

संबंधित लेख