MLC Satish Chavan writes about R R Patil | Sarkarnama

आबा मला धीर देत म्हणाले , भाषणात प्रतिस्पर्ध्यावर हल्ला चढव !

आ. सतीश चव्हाण 
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

आर. आर. पाटील ऊर्फ आबा हे आम्हा युवकांसाठी दैवत होते. राज्याचे गृहमंत्री असताना ते अतिशय साधेपणाने वागत असत. त्यांच्या बोलण्या वागण्यात बडेजाव आणि मोठेपणाचा तोरा नसे.

औरंगाबाद : आर. आर. पाटील ऊर्फ आबा हे आम्हा युवकांसाठी दैवत होते. राज्याचे गृहमंत्री असताना ते अतिशय साधेपणाने वागत असत. त्यांच्या बोलण्या वागण्यात बडेजाव आणि मोठेपणाचा तोरा नसे. ते प्रत्येक कार्यकर्त्यांशी मोकळेपणाने बोलत असत. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना किंवा त्यांच्याकडे काम घेऊन जाताना मनावर कधीही दडपण येत नसे.

आर. आर. पाटील यांचे नाव घेतले की त्यांच्या अनेक आठवणी मनात फेर धरू लागतात. त्यांचा हसरा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि पापण्या ओलावतात. त्यांच्या आठवणींपैकी दोन आठवणी मी आज मांडणार आहे.

पहिली आठवण माझ्या पहिल्या भाषणाची आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे काम करीत असताना आर. आर. आबा आणि अजित दादांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी माझी उमेदवारी निश्‍चित केली. जून 2008 मध्ये माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आर. आर. आबा स्वतः आले होते. अर्ज भरल्यानंतर लागलीच जाहीर सभा होती. व्यासपीठावर आर. आर. आबांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मान्यवर नेते स्थानापन्न झालेले होते. आबांचे भाषण ऐकण्यासाठी तुफान गर्दी झालेली होती.
 

तोपर्यंत मी जाहीर सभेत कधी भाषण केलेले नव्हते. भाषणाच्या कल्पनेने मला घाम फुटला. अन्य नेत्यांची भाषणे सुरू असताना मी आबांच्या जवळ गेलो आणि म्हणालो, "मी आयुष्यात कधी भाषण केलेले नाही. मी आमदार झाल्यावर काय करणार आहे या विषयी बोलू का?'' 

माझी कुरुक्षेत्रावरील अर्जुनासारखी अवस्था झालेली पाहून श्रीकृष्णाच्या भूमिकेत शिरलेले आबा मला हसत हसत म्हणाले, " त्यात काय अवघड आहे? तुझा प्रतिस्पर्धी कोण आहे त्याच्या कामावर हल्ला  कर .  प्रतिस्पर्धी आमदाराने काय करायला पाहिजे होते आणि काय केले नाही यावर टीका कर.''
 

आबांनी सांगितल्याप्रमाणे मी भाषण केले. श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पहिले भाषण जमल्यानंतर माझ्या जिवात जीव आला. भाषण झाल्यावर आबा म्हणाले, " प्रत्येक गोष्ट आपण आयुष्यात केव्हातरी पहिल्यांदा करीत असतो. हिमतीने घ्यायचे. तू चांगला बोललास, असेच बोलत जा.''
 

दुसरी आठवण म्हणजे ते गृहमंत्री असताना जळगावहून त्यांचा फोन आला. ते म्हणाले, "सतीश मी औरंगाबादला निघालोय. माझे मुंबईचे विमान हुकले आहे. तुझ्या घरी जेवायला येणार आहे. औरंगाबादजवळ आल्यावर फोन करतो.''

मी त्यांच्या फोनची वाट पाहत असताना अचानक ते माझ्या घरी येऊन दाखल झाले. आल्यावर थेट हात धुऊन डायनिंग टेबलवर जेवायला बसले. जेवण झाल्यावर माझ्या पत्नीचे आभार मानले. माझ्या पत्नीला म्हणाले, "स्वयंपाक चांगला झाला आहे. सतीशकडे भाकरी मिळणार याची मला खात्री होती.'' एवढे बोलून ते हसत हसत घराबाहेर पडले. इतका मोठा माणूस पण इतके साधेपणाने ते वागले की माझे कुटुंबीय थक्क झालेले होते.

 

( सतीश चव्हाण हे मराठवाडा विभाग पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत . )

संबंधित लेख